(अकोला / वृत्तसंस्था)
चारित्र्याच्या संशयातून गर्भवती पत्नी आणि नऊ वर्षांच्या मुलीची झोपेत हत्या करणाऱ्या मनिष किसनराव म्हात्रे याला अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. यासोबतच त्याच्यावर दहा हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. न्यायालयाच्या या निकालामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
24 एप्रिल 2024 रोजी मनिष म्हात्रे याने पत्नी आणि मुलीवर कुऱ्हाडीने वार करून त्यांची हत्या केल्याची तक्रार अकोल्यातील रामदास पेठ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. आरोपी मनिष आणि त्याची पत्नी रश्मी हे काही वर्षांपासून विभक्त राहत होते. हत्येच्या दिवशी दोघीही लग्नसमारंभासाठी अकोला येथे आल्या होत्या.
याच दरम्यान पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत मनिषने रात्री त्या दोघी झोपेत असताना त्यांच्यावर कुऱ्हाड आणि चाकूने हल्ला केल्याचे तपासातून समोर आले. या घटनेतील आणखी धक्कादायक बाब म्हणजे हत्या करण्यात आली त्यावेळी रश्मी गर्भवती होती.
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सरकार पक्षाने न्यायालयासमोर 14 साक्षीदार तपासले. त्यापैकी दोन साक्षीदार फितूर झाले. आरोपीचे वडील आणि चुलत भाऊ या दोघांनीही साक्ष फिरवली. मात्र, परिस्थितीजन्य पुरावे आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे न्यायालयाने आरोपीविरोधात निकाल दिला.
वैद्यकीय अहवालानुसार आरोपीची पत्नी रश्मी ही 15 आठवड्यांची गर्भवती होती. त्यामुळे या घटनेत केवळ पत्नी आणि मुलीचीच नव्हे, तर तिच्या गर्भातील बाळाचाही मृत्यू झाल्याने तीन जणांचा खून झाल्याचे स्पष्ट होते.
सरकारी वकील मंगेश मानकर यांनी या निकालाचे वर्णन ऐतिहासिक असे केले. आरोपीने 30 वर्षीय पत्नी आणि 9 वर्षांच्या मुलीची हत्या केली असून, परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे सरकार पक्षाने गुन्हा न्यायालयात सिद्ध केला, असे त्यांनी सांगितले.
या खटल्यात न्यायवैद्यकीय अहवाल, परिस्थितीजन्य पुरावे आणि पुराव्यांची साखळी महत्त्वाची ठरली.


