( अहिल्यानगर / वार्ताहर )
महाराष्ट्राच्या अस्सल लोककला आणि पारंपरिक बैठकीच्या लावणीला आपल्या नृत्याने समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी शकुंतलाबाई नगरकर यांचे मंगळवारी वयाच्या ६६व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही काळापासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या. अखेर अहिल्यानगरमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या लोककला आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
शकुंतलाबाई नगरकर या मूळच्या अहिल्यानगरच्या होत्या. तब्बल ५० हून अधिक वर्षे त्यांनी लावणी क्षेत्रात योगदान दिले. पारंपारिक संगीत बारीतील बैठकीची लावणी, शृंगारिक अदा, डोळ्यांतील भावमुद्रा आणि नजाकत यावर त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते. त्यांच्या सादरीकरणातून महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचा ठसा रसिकांना अनुभवायला मिळत असे.
लावणी कलेचे संवर्धन आणि तिला सन्मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी शकुंतलाबाईंनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. पारंपारिक तमाशा आणि संगीत बारीच्या मंचापुरतेच त्यांचे कलाक्षेत्र मर्यादित राहिले नाही. भूषण कोरगावकर यांच्या दिग्दर्शनाखालील ‘संगीत बारी’ या लोकप्रिय नाट्यरूप प्रयोगातून त्यांनी आधुनिक शहरी प्रेक्षक आणि तरुण पिढीपर्यंत अस्सल लावणीचा इतिहास आणि तिचे सौंदर्य पोहोचवले.
शकुंतलाबाईंचा जन्म १९६० मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या आई छबूबाई नगरकर या त्या काळातील नामांकित लावणी कलावंत होत्या. घरातूनच त्यांना लावणी कलेचा वारसा मिळाला. त्यांनी वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी पहिल्यांदा घुंगरू बांधले आणि लावणी क्षेत्रात पदार्पण केले. तसेच त्यांनी वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी कलाक्षेत्रात पाऊल ठेवल्याचा उल्लेखही आहे. त्यांचे सुरुवातीचे आयुष्य नगरमध्ये गेले. त्यांचा अधिक काळ पुणे, सोलापूर आणि बेळगाव या भागांमध्ये गेला.
१९७४ मध्ये मुंबईतील गिरणगावातील प्रसिद्ध लालबागच्या ‘हनुमान थिएटर’मध्ये त्यांच्या लावणीच्या प्रवासाला खऱ्या अर्थाने बहर आला. अनेक दशके त्यांनी आपल्या भारदस्त आवाजाने आणि प्रभावी अदाकारीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
पारंपरिक लावणीच्या शैलीला शास्त्रोक्त नृत्याची जोड देण्यासाठी त्यांनी कथक गुरू वसंतराव घाटगे यांच्याकडून नृत्याचे शिक्षण घेतले. त्यामुळे त्यांच्या बैठकीच्या लावणीला वेगळी उंची प्राप्त झाली. पारंपारिक मंचासोबतच ‘लावणी के रंग’ आणि ‘लव्ह अँड लावणी’ यांसारख्या आधुनिक प्रयोगांतून त्यांनी लावणी नव्या पिढीपर्यंत पोहोचवली.
त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाची दखल केंद्र सरकारसह विविध संस्थांनी घेतली. त्यांना केंद्र सरकारचा नाटक अकादमी पुरस्कार तसेच प्रतिष्ठित ‘शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार’ मिळाला होता. गेल्या वर्षी त्यांना राज्य सरकारचा कला पुरस्कारही देण्यात आला होता. याशिवाय २०१८ मध्ये ‘मुंबई महापौर पुरस्कार’ आणि २०२३ मध्ये ‘नाट्य गौरव पुरस्कार’ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता.
भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी लावणीसम्राज्ञी शकुंतलाबाई नगरकर यांच्या निधनाबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त केली. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी शकुंतलाबाई नगरकर यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या लोककला क्षेत्रातील एका सुवर्ण पर्वाचा अंत झाला. लावणी कलेच्या जतन-संवर्धनासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. बैठकीची लावणी, भावमुद्रा, अदाकारी आणि नजाकतीवर त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते.
‘संगीत बारी’सारख्या प्रयोगांतून त्यांनी अस्सल लावणीची परंपरा आधुनिक प्रेक्षक आणि तरुण पिढीपर्यंत पोहोचवली. लावणीला जागतिक स्तरावर मानाचे स्थान मिळवून देण्यातही त्यांनी मोलाची भूमिका बजावली.
शकुंतलाबाई नगरकर यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीची मोठी हानी झाली असून लावणी क्षेत्रातील दीर्घ आणि समृद्ध कलाप्रवासाला अखेरचा विराम मिळाला आहे.


