(मुंबई)
लोकमान्य टिळकनगर स्थानकावर कुशीनगर एक्सप्रेसच्या एसी कोचमध्ये साफसफाईदरम्यान रेल्वे सफाई कर्मचाऱ्यांना एका ५ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला. या घटनेने रेल्वे स्थानक परिसरात खळबळ उडाली. सफाई कर्मचाऱ्यांनी तत्काळ रेल्वे पोलिसांना माहिती दिली. आरपीएफ आणि जीआरपीचे पथक घटनास्थळी दाखल झाले व मृतदेह ताब्यात घेतला. पंचनामा करून मृतदेह राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
अपहरण प्रकरणाशी धागेदोरे
उपलब्ध माहितीनुसार, या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार गुजरातमधील सूरत येथील अमरोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. तक्रारीत मुलीचे अपहरण हे त्याच्याच मावस भावाने केल्याचा आरोप करण्यात आला होता. पोलिसांनी आरोपीचा मोबाईल ट्रेस करत चौकशी सुरू केली होती.
दरम्यान, अमरोली पोलिसांचे पथक लोकमान्य टिळक टर्मिनसवर पोहोचले. त्यांनी रेल्वे पोलिसांकडून माहिती घेतली असता, कुशीनगर एक्सप्रेसमधून एका मुलीचा मृतदेह सापडल्याचे कळले. मृतदेहाचा फोटो अमरोली पोलिसांनी पीडित कुटुंबीयांना दाखवला. फोटो पाहून कुटुंबाने मृत मुलगी आपलाच असल्याची खात्री दिली. त्यानंतर हे प्रकरण फक्त अपहरणाचे नसून, अपहरणानंतर मुलीची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
कुशीनगर एक्स्प्रेस (गाडी क्रमांक २२५३७) शनिवारी (दि. २३) दुपारी साधारण १.१५ वाजता LTT च्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर पोहोचली. हीच गाडी नंतर काशी एक्स्प्रेस (१५०१७) म्हणून पुढे रवाना होते. मात्र, नियमानुसार सुरू असलेल्या स्वच्छतेदरम्यान स्वच्छता कर्मचाऱ्याने एसी कोच बी-२ च्या बाथरूममध्ये डोकावले असता, कचराकुंडीत एका लहान मुलीचा मृतदेह दिसून आला. हे दृश्य पाहून तो हादरला आणि त्याने तात्काळ स्टेशन व्यवस्थापकांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन, आरपीएफ आणि जीआरपी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून, मृत मुलीची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मृत मुलाचे कुटुंब मूळचे बिहारमधील सिवान जिल्ह्यातील आहे. सध्या पोलीस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून आरोपींचा शोध सुरू आहे.

