(मुंबई)
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठित कला दिग्दर्शक नितीन बोरकर यांचे ब्रेन स्ट्रोकमुळे रविवारी निधन झाले. नेरूळ येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.
नितीन बोरकर गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजाराशी झुंज देत होते. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीने एक अनुभवी दिग्दर्शक आणि सर्जनशील कलाकार गमावला आहे. त्यांच्या निधनाची बातमी येताच, मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी सोशल मीडिया आणि इतर माध्यमांतून शोक व्यक्त केला आहे.
नितीन बोरकर यांनी ‘दगडाबाईची चाळ’, ‘मी वसंतराव’ यांसारख्या मराठी चित्रपटांसह हिंदी सिनेमांमध्येही कला दिग्दर्शन केले आहे. ‘बॉडीगार्ड’, ‘द माईटी हार्ट’ आणि ‘आणि काय हवं’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांचे योगदान विशेष उल्लेखनीय आहे. त्यांचा कलात्मक प्रवास ४० हून अधिक सिनेमांमध्ये स्पष्ट दिसून येतो.
नितीन बोरकर यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीतील चाहत्यांमध्ये दु:खाचे वातावरण पसरले असून त्यांच्या कलात्मक योगदानाला सदैव स्मरण ठेवले जाईल.

