(मुंबई /वृत्तसंस्था)
राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत असलेल्या TET-CTET पात्र शिक्षकांसाठी शालेय शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. शिक्षकांच्या पदोन्नतीसंदर्भातील पूर्वीचा शासन निर्णय बदलत नवीन नियमावली आणि वार्षिक वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या निर्णयामुळे पदोन्नतीची प्रक्रिया अधिक पारदर्शक, वेळबद्ध आणि राज्यभर एकसमान पद्धतीने राबविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
यापूर्वी 1 सप्टेंबर 2025 पूर्वी TET उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांनाच पदोन्नतीसाठी पात्रता होती. मात्र, नव्या निर्णयानुसार दरवर्षी 1 ऑगस्टपर्यंत TET किंवा CTET उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांना पदोन्नतीचा लाभ मिळणार आहे. तसेच पात्र शिक्षकांची संपूर्ण पदोन्नती प्रक्रिया प्रत्येक वर्षी 31 ऑगस्टपर्यंत पूर्ण करून नियुक्ती आदेश देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
शालेय शिक्षण विभागाने यासंदर्भात 14 मे रोजी जारी केलेले पत्र रद्द केले असून, त्याऐवजी सुधारित नियमावली लागू केली आहे. या नव्या कार्यपद्धतीनुसार चालू वर्षासह पुढील सर्व वर्षांतील पदोन्नती प्रक्रिया निश्चित वेळापत्रकानुसार पूर्ण केली जाणार आहे.
ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पदोन्नती समितीची बैठक
नव्या निर्देशांनुसार प्रत्येक वर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पदोन्नती समितीची बैठक आयोजित केली जाईल. बैठकीच्या तारखेपर्यंत संबंधित शिक्षकांचा सेवाकाल, TET-CTET पात्रता आणि इतर आवश्यक अर्हता विचारात घेतली जाईल. त्यानंतर पात्र शिक्षकांची अंतिम यादी निश्चित करून 31 ऑगस्टपूर्वी पदोन्नती आदेश जारी करण्यात येतील.
दरवर्षीचे निश्चित वेळापत्रक जाहीर
शिक्षकांच्या पदोन्नती प्रक्रियेसाठी शालेय शिक्षण विभागाने वार्षिक वेळापत्रकही निश्चित केले आहे.
- 1 जानेवारी: तात्पुरती सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध.
- 31 जानेवारीपर्यंत: हरकतींची छाननी करून अंतिम सेवाज्येष्ठता यादी जाहीर.
- 15 ते 22 फेब्रुवारी: पदोन्नती समितीची बैठक.
- पुढील एका आठवड्यात: पात्र शिक्षकांची शिफारस.
- 31 मार्चपर्यंत: पदोन्नती आदेश निर्गमित.
- 2 मे: शिक्षकांना नवीन पदस्थापनेसाठी कार्यमुक्त करण्यात येणार.
सर्व जिल्हा परिषदांना काटेकोर अंमलबजावणीचे निर्देश
राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये पदोन्नती प्रक्रियेत एकसमानता राहावी यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर या निर्णयाच्या अंमलबजावणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच पदोन्नती प्रक्रिया राबविताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचे उल्लंघन होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याचे स्पष्ट निर्देश शासनाने दिले आहेत.
शिक्षकांना काय होणार फायदा?
नवीन नियमावलीमुळे TET-CTET पात्र शिक्षकांच्या पदोन्नतीतील विलंब कमी होणार असून, पात्रतेनुसार वेळेत बढती मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. राज्यभर एकसमान वेळापत्रक लागू झाल्याने पदोन्नती प्रक्रियेत पारदर्शकता वाढण्यासोबतच शिक्षकांमधील संभ्रमही दूर होणार असल्याचे शिक्षण क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.

