(मुंबई)
अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर गंभीर परिणाम दिसू लागले असून त्याचा थेट फटका अनेक देशांना बसत आहे. या युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या तेलासह LPG आणि LNG गॅसच्या किंमतींमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर इराणकडून अत्यंत महत्त्वाचा सागरी मार्ग असलेली होर्मुज सामुद्रधुनी बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने तेलवाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. उपलब्ध माहितीनुसार, या मार्गावरून येणाऱ्या तेल टँकरची संख्या तब्बल 80 टक्क्यांनी घटली असून समुद्रात हजारो टँकर अडकून मोठा जाम निर्माण झाला आहे.
होर्मुज सामुद्रधुनीतून टँकर आढळल्यास त्यांना आग लावण्याची धमकी इराणकडून देण्यात आल्याने अनेक देश अडचणीत सापडले आहेत. या मार्गावरून जगातील मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल वाहतूक होत असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती झपाट्याने वाढत आहेत. या संघर्षाचा परिणाम भारत यालाही जाणवत असून भारतात सध्या ऊर्जा आयात जवळपास ठप्प झाल्याची स्थिती आहे. मात्र, भारत सरकारने दिलासा देत सांगितले आहे की देशाकडे सध्या पेट्रोल आणि डिझेलचा पुढील 25 दिवस पुरेल इतका साठा उपलब्ध आहे मात्र नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.
सरकारने हेही स्पष्ट केले आहे की, युद्ध अधिक काळ सुरू राहिल्यास पर्यायी आयात मार्गांचा वापर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत असले तरी देशांतर्गत पातळीवर त्याचा परिणाम होणार नाही आणि इंधन दर स्थिर ठेवले जातील. मात्र, खरी चिंता ही स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या LPG गॅसची आहे. कारण भारतात वापरल्या जाणाऱ्या सुमारे 80 टक्के LPG गॅसचा पुरवठा होर्मुज सामुद्रधुनीतून होतो आणि तोच मार्ग सध्या बंद असल्याने भविष्यात तुटवड्याची शक्यता नाकारता येत नाही.
भारत एकूण LPG गरजेपैकी जवळपास 60 टक्के गॅस आयात करतो आणि सध्या या आयातीस कोणताही ठोस पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे युद्ध दीर्घकाळ सुरू राहिल्यास सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरावर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो. तेल कंपन्यांनी LPG उत्पादन वाढवण्यास सुरुवात केली असून सरकारकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. सध्या तरी कच्चे तेल, पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा तुटवडा नाही, असे स्पष्ट करण्यात आले असले तरी होर्मुज मार्गावरील परिस्थिती कायम राहिल्यास ऊर्जा सुरक्षेचे मोठे आव्हान भारतासमोर उभे राहण्याची शक्यता आहे.

