कर्करोग हे जगभरातील मृत्यूचे एक प्रमुख कारण आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अंदाजानुसार 2050 पर्यंत नव्याने आढळणाऱ्या कर्करोग रुग्णांची संख्या तब्बल 35 कोटींपर्यंत वाढू शकते, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय आणि आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. डॉक्टरांच्या मते, जीवनशैलीत साधे बदल करून कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो. त्यांनी सुचवलेले ८ महत्त्वाचे उपाय पुढीलप्रमाणे—
कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी ८ उपाय
अल्ट्रा-प्रोसेस्ड अन्न टाळा
– बिस्किटे, चिप्स, पॅकेज्ड स्नॅक्स यांसारखे अल्ट्रा-प्रोसेस्ड अन्न कर्करोगाचा धोका 20-30% पर्यंत वाढवते, असे बीएमजे जर्नलमधील 2024 च्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.
जास्त फायबरयुक्त अन्न खा
– AICR नुसार, दैनंदिन आहारात 10 ग्रॅम अतिरिक्त फायबर घेतल्याने कोलोरेक्टल कर्करोगाचा धोका 10% नी कमी होतो. हिरव्या पालेभाज्या, ब्रोकोली, गाजर आणि लिंबूवर्गीय फळांमध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात. हे शरीरातील पेशींना होणारे नुकसान टाळतात आणि कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध करतात.
प्रक्रिया केलेले मांस कमी करा
– WHO च्या मते, दररोज 50 ग्रॅम प्रक्रिया केलेले मांस खाल्ल्याने कोलोरेक्टल कर्करोगाचा धोका 18% नी वाढतो.
निरोगी तेलांचा वापर करा
– ऑलिव्ह ऑइलने समृद्ध भूमध्य आहार घेतल्याने कोलोरेक्टल कर्करोगाचा धोका ३०% नी कमी होतो.
अल्कोहोलपासून दूर रहा
– अल्कोहोलमुळे ७ प्रकारचे कर्करोग होतात. दिवसातून फक्त एक पेय घेतल्यानेही स्तनाच्या कर्करोगाचा धोका ७-१०% नी वाढतो (NIH).
वजन नियंत्रणात ठेवा
– लठ्ठपणा किमान १३ प्रकारच्या कर्करोगासाठी जोखीम घटक आहे. अमेरिकेत सुमारे ४०% कर्करोग रुग्ण लठ्ठपणाशी संबंधित आहेत (CDC).
दररोज व्यायाम करा
– नियमित व्यायामाने कोलन, स्तन आणि गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगाचा धोका २०-४०% नी कमी होतो (NCI).
पुरेशी झोप घ्या, ताण कमी करा
– सततचा ताण आणि झोपेचा अभाव रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करतो. जे लोक दिवसाला ६ तासांपेक्षा कमी झोपतात, त्यांचा कर्करोगामुळे मृत्युदर २४% जास्त असल्याचे अभ्यासात दिसून आले आहे.
कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास उपचार करणे सोपे होते. त्यामुळे 40 वर्षांनंतर नियमितपणे आरोग्य तपासणी करा. तसेच, हेपेटायटीस बी आणि एचपीव्ही सारखी लसीकरणे काही विशिष्ट कर्करोगांपासून बचाव करतात. जीवनशैलीत हे छोटे बदल करून तुम्ही कर्करोगाचा धोका लक्षणीयरीत्या कमी करू शकता. हे उपाय तुम्हाला दीर्घकाळ निरोगी आणि सुरक्षित राहण्यास मदत करतील.
(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आपल्याला काही त्रास जाणवत असल्यास तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

