काही लोकांना मच्छर किंवा डास खुपच त्रास देतात. तर काही लोकांना मच्छर आजूबाजूला असूनही चावत नाहीत. अनेकवेळा बाजूला बसलेल्या व्यक्तीला डास चावत नाहीत आणि आपल्याला मात्र डासांनी फोडून खाल्लेले असते, असे नेमके का होते. काही लोकांना डास जास्तच चावतात. तर काही लोकांना क्वचितच, असे का असते? या मागे विज्ञान आहे. काही रक्त गटाच्या लोकांना जादा मच्छर चावतात तर काही रक्त गटाच्या लोकांना कमी चावतात, असेही बरेचदा असते.
कार्बनडाय ऑक्साईड आणि मच्छर
मच्छर माणसांना शोधण्यासाठी कार्बन डायऑक्साईडची (CO2) मदत घेत असतात. म्हणजे आपण जो उच्छवास सोडतो त्याचा ते अदमास घेत असतात. ज्या लोकांच्या शरीरातून कार्बनडाय ऑक्साईड CO2 जादा निघतो त्यांना किंवा मोठे उंचीने अधिक असलेल्यांना मच्छर अधिक निशाणा बनवित असतात. जर तुमचा चयापचय दर जास्त असेल, तर तुम्ही जास्त कार्बन डायऑक्साइड तयार कराल, ज्यामुळे तुम्हाला डास चावण्याची शक्यता वाढते. याचा अर्थ असा की, ज्या लोकांचा चयापचय दर जास्त आहे किंवा अलीकडेच व्यायाम केला आहे ते डासांच्या चाव्यासाठी अधिक आकर्षक लक्ष्य आहेत.
दुस-या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, डास गर्भवती महिलांकडे जास्त आकर्षित होतात. हे गर्भवती महिलांच्या शरीराचे तापमान आणि चयापचय दर जास्त असल्यामुळे असू शकते.
सुमारे 5 ते 15 मीटर अंतरावरुन डासांना माणसे दिसत असतात. माणसांच्या जवळ पोहचल्यानंतर ते आपल्या दृष्टीचा वापर करत असतात. ते जेव्हा आपल्या शरीराच्या एकदम जवळ पोहचतात. तेव्हा ते शरीराच्या तापमानाचा अदमास घेतात. आपल्या शरीरातून निघालेले गंध देखील मच्छरांना अधिक आकर्षित करीत असतो. घामात असलेल्या लॅक्टीक एसिड, युरिक एसिड आणि अमोनिया सारख्या रसायन मच्छरांना आवतण देत असतात. प्रत्येक माणसाचा शरीराचा गंध वेगवेगळा असतो. जी जिन्स आणि बॅक्टेरियावर अवलंबून असते. त्यामुळे ज्याच्या शरीरातून अधिक वास येतो त्याला सर्वाधिक डासांचा उपद्रव होतो. त्यालाच डास जास्त चावत असतात.
आपला रक्तगट देखील डास आणि मच्छरांना आकर्षित करीत असतो. अनेक संशोधनात हे स्पष्ट झाले की ‘O’ रक्त गटाच्या लोकांना मच्छर जास्त चावतात. तसेच ‘A’ रक्त गटाच्या लोकांना मात्र मच्छर कमी पसंत करतात. असे का ? तर मच्छर काही रक्त गटांत असलेल्या रासायनिक घटकांना आकर्षित होऊन त्या व्यक्तींना जास्त चावत असतात. एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, डासांच्या काही प्रजाती O रक्तगट असलेल्या लोकांकडे दुप्पट आकर्षित होतात. O हा डासांचा पसंतीचा रक्त गट आहे आणि A हा सर्वात कमी पसंतीचा आहे. B रक्तगट असलेले लोकं O आणि A स्पेक्ट्रमच्या मध्ये कुठेतरी येतात.
शरीराचे तापमान आणि घाम
मच्छर अधिक तापमान असलेल्या किंवा अधिक घाम येणाऱ्या व्यक्तींच्या शरीराकडे कायम आकर्षित होत असतात. मच्छरांना त्यांना चावणे आवडते. म्हणून उन्हाळ्यात व्यायाम केल्यानंतर मच्छर त्यांना अधिक चावत असतात. घामातून निघणारा ओलावा थंडावा आणि वास मच्छरांना जवळ बोलावतो.