(वॉशिंग्टन)
तामिळनाडूतील मंदिरांमधून चोरी करून अमेरिकेत नेण्यात आलेल्या तीन अत्यंत दुर्मिळ आणि प्राचीन कांस्य मूर्ती भारत सरकारकडे परत देण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. वॉशिंग्टन येथील स्मिथसोनियन नॅशनल म्युझियम ऑफ एशियन आर्टने या मूर्ती बेकायदेशीर मार्गाने तस्करी करून आणल्याची कबुली देत, त्या भारताकडे सुपूर्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हिंदू धर्मासाठी अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या या मूर्ती ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्ट्या अमूल्य आहेत.
ऐतिहासिक पुराव्यांमुळे चोरी सिद्ध
या मूर्तींच्या मूळ स्रोताचा शोध घेताना ऐतिहासिक छायाचित्रे निर्णायक ठरली. फ्रेंच इन्स्टिट्यूट ऑफ पॉंडिचेरीकडे 1950 च्या दशकातील काही दुर्मिळ छायाचित्रे उपलब्ध होती. या छायाचित्रांमध्ये संबंधित मूर्ती तामिळनाडूतील मंदिरांमध्ये स्पष्टपणे दिसत होत्या. भारतीय कायद्यानुसार हे छायाचित्रे चोरीचा ठोस पुरावा मानले जातात. भारतीय पुरातत्व विभागाने या पुराव्यांची सखोल तपासणी केल्यानंतर मूर्तींची बेकायदेशीर तस्करी झाल्याचे निश्चित केले.
बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री
तपासात असे उघड झाले की 1956 ते 1959 या कालावधीत या मूर्ती तामिळनाडूतील मंदिरांमध्ये होत्या. मात्र भारतीय कायद्यांचे उल्लंघन करून त्या देशाबाहेर नेण्यात आल्या. स्मिथसोनियन संग्रहालय आणि अमेरिकेतील भारतीय दूतावास यांच्यात सध्या समन्वय सुरू असून, मूर्ती हस्तांतरण प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
तंजावरमधील शिव नटराज मूर्तीचा ठोस पुरावा
या तिन्ही मूर्तींपैकी शिव नटराज ही मूर्ती तंजावर जिल्ह्यातील तिरुथुराईपुंडी तालुक्यातील श्री भव औषधेश्वर मंदिरातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. 1957 मधील छायाचित्रांमध्ये ही मूर्ती मंदिरात असल्याचे दिसून येते. हीच मूर्ती स्मिथसोनियन संग्रहालयाने 2002 मध्ये न्यूयॉर्कमधील डोरिस विनर गॅलरीकडून खरेदी केली होती. संग्रहालयाच्या अंतर्गत तपासात विक्रीदरम्यान सादर करण्यात आलेली कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले.
कोणत्या आहेत परत येणाऱ्या तीन मूर्ती:
- शिव नटराज: 10 व्या शतकातील (इ.स. 990) तंजावर येथील श्री भव औषधेश्वर मंदिरातील कांस्य मूर्ती
- सोमास्कंद: 12 व्या शतकातील दुर्मिळ कांस्य कलाकृती
- संत सुंदरर आणि परवई: 16 व्या शतकातील प्राचीन धार्मिक मूर्ती
या निर्णयामुळे भारताच्या सांस्कृतिक वारशाच्या संरक्षणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले गेले असून, आंतरराष्ट्रीय पातळीवर बेकायदेशीर कलावस्तू तस्करीविरोधातील लढ्याला बळ मिळाले आहे.

