(मुंबई / रामदास गमरे)
प्राचीन महाराष्ट्रातील व्यापारी मार्ग हे केवळ मालवाहतुकीचे रस्ते नव्हते, तर दख्खनचा अंतर्गत प्रदेश, कोकणातील बंदरे तसेच उत्तर-दक्षिणेकडील व्यापारी केंद्रांना जोडणारी आर्थिक आणि सांस्कृतिक साखळी होती. या मार्गांमुळे व्यापाराबरोबरच बौद्ध धम्म, कला, क्रीडा, स्थापत्य, आचार-विचार आणि जीवनशैली यांसारख्या विविध प्रवाहांचा प्रचार व प्रसार झाला, असे प्रतिपादन हेमंत रामचंद्र बेकरे यांनी केले.
बौद्धजन सहकारी संघ, ता. गुहागर, जिल्हा रत्नागिरी, मुंबई विभाग संलग्न संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या कालावधीत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रवचन मालिकेचे आठवे पुष्प तालुक्याचे उपाध्यक्ष अरविंद जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आणि शिक्षण समितीचे माजी अध्यक्ष जतिन मागे यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले. यावेळी ‘प्राचीन बौद्ध लेणी’ या विषयावर मार्गदर्शन करताना बेकरे बोलत होते.
कोकण, दख्खन आणि घाटमार्ग यांची भौगोलिक रचना व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाची होती. सह्याद्रीच्या डोंगररांगांमुळे कोकण आणि दख्खनचे पठार यांच्यामध्ये नैसर्गिक अडथळे निर्माण होत असल्याने घाटमार्गांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. जुन्नर-कोकण परिसराला जोडणारा नाणेघाट, पुणे-उत्तर कोकण जोडणारा बोरघाट, जुन्नर-कोकण जोडणारा माळशेज घाट, नाशिक-पश्चिम किनारा जोडणारा थळघाट आणि सातारा-कराड-कोकण जोडणारा कुंभार्ली घाट हे त्यातील महत्त्वाचे मार्ग होते.
नाशिक, जुन्नर, नाणेघाट, कोकण, कल्याण/सोपारा यांना जोडणारा मार्ग तसेच पैठण-तगर-कोकण मार्ग अशा व्यापारी मार्गांचे व्यापक जाळे अस्तित्वात होते. धाराशिव हेही महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते. नाशिक-त्र्यंबक-कोकण मार्ग गोदावरी खोऱ्यातील महत्त्वाचे व्यापारी आणि धार्मिक केंद्र होते. नाशिक येथील पांडवलेणी (बुद्ध लेणी) ही घाटमार्गांद्वारे जोडलेली केंद्रे होती. व्यापाऱ्यांनी येथे धम्मदान दिल्यामुळे अनेक स्तूप आणि धार्मिक केंद्रांची निर्मिती झाली, असे बेकरे यांनी सांगितले.
कोकणातील बंदरांपासून चार किलोमीटर अंतरावर बुद्ध स्तूप, कोरलेली लेणी आणि शिलालेख आढळतात. बुद्धानंतर सम्राट अशोकाने ८४ हजार लेणी निर्माण करून बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. भारताच्या भूमीत कुठेही खोदकाम केले तर बुद्धच सापडतो, कारण सातवाहन काळापर्यंत बुद्ध लेणी निर्माण करण्यात आली, असा दावा त्यांनी केला.
या संदर्भात काही लोकांनी गैरसमज पसरवले होते; मात्र आता ते गैरसमज खोटे ठरले आहेत. सातवाहन राजानेही आपापल्या परीने बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. आज काही लेण्यांना पांडवलेणी आदी नावे दिली असली, तरी त्यातील कोरीव काम, लिपी आणि शिलालेखांचा अभ्यास केल्यास ती सर्व बुद्ध लेणी असल्याचे पुराव्यासह सिद्ध होते. त्यामुळे अखंड भारत बौद्धमय होता, असेही बेकरे यांनी प्रतिपादन केले.
गौतम बुद्ध यांनी कोकण भ्रमण केले असून सम्राट अशोकाने सोपारा येथे व्यापारी केंद्र उभारले होते, असे लक्षात येते. त्यामुळे कोकणातील बंदरे आणि मालवाहतूक मार्ग ही बौद्धकालीन व्यापारी केंद्रे होती, असे बेकरे यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला तालुका संघाची मध्यवर्ती कमिटी, संस्कार समिती, विविध समित्या व उपसमित्यांचे कार्यकर्ते तसेच उपासक-उपासिका मोठ्या संख्येने ऑनलाइन माध्यमातून सहभागी झाले होते. सरतेशेवटी चेअरमन दीपक मोहिते यांनी सर्वांचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.


