अपेंडिक्स हा आपल्या शरीरातील असा अवयव आहे की ज्याशिवायही माणूस सहज जगू शकतो. त्यामुळे त्याला ‘वेस्टिजियल अवयव’ असे म्हटले जाते. मात्र या छोट्याशा अवयवामध्ये संसर्ग झाला किंवा सूज आली तर ती गंभीर समस्या ठरू शकते. योग्य वेळी उपचार न झाल्यास अपेंडिक्समध्ये पू साचून तो फुटण्याचा धोका निर्माण होतो आणि त्यामुळे जीवघेणी गुंतागुंत होऊ शकते.
अपेंडिक्स हा पोटाच्या उजव्या बाजूला मोठ्या आतड्याला जोडलेला बोटाच्या आकाराचा लहान अवयव आहे. संशोधनानुसार मानवी उत्क्रांतीमध्ये या अवयवाचे कार्य कमी असले तरी तो शरीरातील चांगल्या बॅक्टेरियांचा साठा राखण्यात आणि रोगप्रतिकारक शक्तीला मदत करण्यात भूमिका बजावतो. परंतु या अवयवात संसर्ग झाला किंवा अडथळा निर्माण झाला तर त्या स्थितीला अपेंडिसायटिस (Appendicitis) असे म्हणतात.
वैद्यकीय अभ्यासानुसार जगभरातील सुमारे ७ टक्के लोकांना आयुष्यात किमान एकदा तरी अपेंडिसायटिसचा त्रास होऊ शकतो. ही समस्या सुरुवातीला साध्या पोटदुखीसारखी वाटू शकते, पण काही तासांत ती तीव्र रूप धारण करते. वेळेत उपचार न झाल्यास अपेंडिक्स फुटून पोटात संसर्ग पसरू शकतो.
अपेंडिसायटिस का होतो?
अपेंडिक्समध्ये विष्ठा, परजीवी जंतू किंवा एखादी बाह्य वस्तू अडकल्याने तिथे अडथळा निर्माण होतो. त्यामुळे रक्तपुरवठा कमी होतो आणि जीवाणूंची वाढ वेगाने होते. परिणामी अपेंडिक्सला सूज येते आणि त्यात पू साचतो. पचनसंस्थेतील संसर्ग किंवा लिम्फ नोड्सना आलेली सूजही याला कारणीभूत ठरू शकते. सूज वाढल्यास अपेंडिक्सच्या भिंती कमकुवत होतात आणि तो फुटण्याचा धोका वाढतो.
अपेंडिसायटिसची प्रमुख लक्षणे
अपेंडिक्सची लक्षणे सुरुवातीला हलकी असतात, पण हळूहळू ती गंभीर होऊ शकतात.
- नाभीभोवती सुरू होणारी वेदना
- वेदना हळूहळू पोटाच्या उजव्या खालच्या भागात जाणे
- चालताना, खोकताना किंवा पोटाला स्पर्श केल्यावर वेदना वाढणे
- मळमळ आणि उलट्या
- भूक न लागणे
- बद्धकोष्ठता किंवा गॅसचा त्रास
- ओटीपोटात सूज
- हलका ताप
- लघवी करताना किंवा पोटाच्या इतर भागात वेदना
अपेंडिक्स फुटल्यास काय होते?
जर अपेंडिसायटिसवर २४ ते ४८ तासांत उपचार झाले नाहीत, तर अपेंडिक्स फुटण्याचा धोका असतो. अशावेळी त्यातील पू आणि विष्ठा पोटात पसरते आणि पेरिटोनायटिस नावाचा गंभीर संसर्ग होऊ शकतो. काही प्रकरणांमध्ये सेप्सिससारखी जीवघेणी स्थिती निर्माण होऊ शकते किंवा पू साचून गाठ (Abscess) तयार होते. अशा परिस्थितीत तातडीची शस्त्रक्रिया करावी लागते.
अपेंडिसायटिसचे निदान कसे केले जाते?
डॉक्टर सुरुवातीला पोटाची शारीरिक तपासणी करतात. त्यानंतर काही चाचण्या केल्या जातात.
- रक्त तपासणी (WBC वाढलेले असणे)
- लघवीची तपासणी
- सोनोग्राफी
- सीटी स्कॅन
या चाचण्यांच्या आधारे अपेंडिसायटिसचे निश्चित निदान केले जाते.
उपचार कसे केले जातात?
अपेंडिक्सवरचा सर्वात प्रभावी उपचार म्हणजे अपेंडिक्टोमी (Appendectomy) म्हणजेच अपेंडिक्स काढण्याची शस्त्रक्रिया. आजकाल बहुतेक रुग्णांमध्ये लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया केली जाते. या पद्धतीत लहान छिद्रांमधून दुर्बिणीद्वारे ऑपरेशन केले जाते. त्यामुळे रुग्ण लवकर बरा होतो आणि मोठे व्रण राहत नाहीत. मात्र अपेंडिक्स आधीच फुटला असेल तर ओपन सर्जरी करावी लागते.
अपेंडिसायटिस टाळण्यासाठी काय करावे?
या आजारापासून पूर्णपणे बचाव करण्याचा ठोस उपाय नसला तरी काही सवयी उपयोगी ठरू शकतात.
- आहारात फायबरचे प्रमाण वाढवा
- फळे, भाज्या आणि कडधान्ये नियमित खा
- शस्त्रक्रियेनंतर २ ते ३ आठवडे जड वस्तू उचलणे टाळा
- हलका आणि पचायला सोपा आहार घ्या
- जखमेची स्वच्छता राखा
- रोज हलका व्यायाम किंवा चालणे
- पुरेसे पाणी प्या
तज्ज्ञांच्या मते, अपेंडिक्स काढल्यानंतर पचनक्रिया किंवा दैनंदिन जीवनावर कोणताही गंभीर परिणाम होत नाही.
पोटाच्या उजव्या बाजूला अचानक आणि तीव्र वेदना होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. साधी पोटदुखी समजून वेळ घालवणे धोकादायक ठरू शकते. योग्य वेळी निदान आणि उपचार केल्यास अपेंडिसायटिसवर सहज मात करता येते आणि गंभीर गुंतागुंत टाळता येते.

