(रत्नागिरी / प्रतिनिधी)
भाट्ये ते मांडवीदरम्यान समुद्रात अचानक आलेल्या अजस्त्र लाटांच्या तडाख्याने फिशिंग बोट उलटून सात मच्छिमार संकटात सापडल्याची घटना घडली. या वेळी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून राजिवड्यातील मच्छिमारांनी क्षणाचाही विलंब न करता समुद्रात धाव घेतली. जीवाची पर्वा न करता राबविलेल्या बचावकार्यात सातही मच्छिमारांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. या धाडसी कामगिरीबद्दल राजिवड्यातील या जीवरक्षक मच्छिमारांचा नुकताच विशेष सत्कार करण्यात आला.
भाट्ये ते मांडवीदरम्यान मासेमारी सुरू असताना अचानक समुद्राला आलेल्या उधाणामुळे जुवेब हुश्ये यांच्या फिशिंग बोटीला अजस्त्र लाटांचा जोरदार तडाखा बसला आणि बोट उलटली. त्यामुळे बोटीवरील मच्छिमार संकटात सापडले. समुद्रातील परिस्थिती अत्यंत बिकट असतानाही राजिवड्यातील मच्छिमारांनी मदतीसाठी तत्काळ धाव घेतली. सामाजिक कार्यकर्ते अजमल उर्फ अज्जु हुनेरकर आणि खालिद होडेकर यांच्या ‘सुरैय्या’ बोटीवरील मच्छिमार तसेच रजिन हुनेरकर यांच्या ‘अनाबिया’ बोटीवरील मच्छिमारांनी बचावकार्य सुरू केले. प्रतिकूल समुद्रस्थिती, अजस्त्र लाटा आणि जीविताचा धोका अशा परिस्थितीतही त्यांनी अथक प्रयत्न करून संकटात सापडलेल्या सातही जणांना सुरक्षित बाहेर काढले. या बचावकार्यात ‘सुरैय्या’ बोटीवरील अजमल (अज्जु) हुनेरकर, खालिद होडेकर, कैफ होडेकर, यास्मिन पावसकर, माई पाटील, अफान वस्ता आणि खालिद मजगावकर, तसेच ‘अनाबिया’ बोटीवरील शहबाज वस्ता आणि अरमान हुनेरकर यांनी सहभाग घेतला. त्यांच्या धाडसामुळे समुद्रातील मोठी दुर्घटना टळली असून, त्यांच्या कार्याचे परिसरातून कौतुक होत आहे.
दरम्यान, संकटाच्या प्रसंगी माणुसकीचा हात पुढे करीत समुद्रात जीव धोक्यात घालून सात जणांचे प्राण वाचविणाऱ्या या मच्छिमारांचा नगरसेवक अमित विलणकर, मुकुंद विलणकर, साई खेऊर आणि फैयाज हुनेरकर यांनी त्यांच्या घरी जाऊन पुष्पगुच्छ देत गौरव केला. संकटसमयी दाखविलेल्या या धैर्यामुळे राजिवड्यातील मच्छिमारांनी समुद्राशी असलेले आपले नाते केवळ उपजीविकेपुरते मर्यादित नसून, गरजेच्या वेळी जीव वाचविण्यासाठीही तेवढेच खंबीर असल्याचे अधोरेखित केले आहे.


