(रत्नागिरी / प्रतिनिधी)
गणेशोत्सव २०२५ निमित्त जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने व्यापक तयारी केली आहे. जिल्हाधिकारी श्री. एम. देवेंद्र सिंग यांच्या सूचनेनुसार तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्गावरील प्रमुख फाटे, चेकपोस्ट तसेच रेल्वे स्थानकांवर आरोग्य तपासणी केंद्रे उभारण्यात येणार आहेत. १९ ऑगस्ट रोजी झालेल्या नियोजन बैठकीत या निर्णयाला अंतिम रूप देण्यात आले असून, तपासणी पथके २२ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत कार्यरत राहणार आहेत.
या कालावधीत तब्बल २० ठिकाणी तपासणी केंद्रे सुरू होणार असून त्यात खेड तालुक्यात गुणदे फाटा, भरणेनाका आणि खेड रेल्वे स्टेशन, चिपळूण तालुक्यात पेढे सवतसडादर्शन, कळंबस्ते तिठा, बहादुरशेख नाका, अलोरे घाटमाथा, दहिवली फाटा व चिपळूण रेल्वे स्टेशन, संगमेश्वर तालुक्यात तुरळ, एस.टी. स्टॅण्डजवळील वळण, वांद्री, देवरुख मुर्शी व संगमेश्वर रेल्वे स्टेशन, रत्नागिरी तालुक्यात हातखंबा तिठा, पाली व रत्नागिरी रेल्वे स्टेशन, लांजा तालुक्यात वेरळ व कुवे गणपती मंदिर समोर तर राजापूरमध्ये एस.टी. स्टॅण्ड येथे केंद्र उभारण्यात येतील.
प्रत्येक पथकात प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी, आवश्यक औषधी साठा, प्रथमोपचार सुविधा तसेच तातडीच्या सेवेसाठी ऍम्ब्युलन्सची उपलब्धता असेल. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत चेकपोस्ट ठिकाणी पेंडॉल उभारले जाणार असून या ठिकाणी आरोग्य विभागासह संबंधित विभागांचे कर्मचारी तैनात राहतील. गणेशोत्सव काळात चाकरमान्यांना सुरक्षित आणि सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी सांगितले.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे यांनी चाकरमान्यांनी या आरोग्य तपासणी सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले असून गणेशोत्सव काळात प्रत्येक चाकरमान्याचे आरोग्य संरक्षण हेच जिल्हा प्रशासनाचे ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

