(रत्नागिरी /प्रतिनिधी)
कायदा व सुव्यवस्था, नागरिकांची सुरक्षितता आणि सामाजिक सलोखा याबाबत जनजागृतीचा संदेश केवळ पोलीस ठाणे किंवा कार्यालयापुरता मर्यादित न ठेवता तो थेट गावागावातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने ‘मिशन प्रबोधन’ हा अभिनव नागरिकाभिमुख उपक्रम हाती घेतला आहे. ग्रामसभा, शाळा-महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणे तसेच शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचत सुरक्षिततेविषयी संवाद साधण्यावर या उपक्रमाचा भर राहणार आहे. विविध जनजागृती उपक्रमांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे १५ लाख नागरिकांपर्यंत सुरक्षा संदेश पोहोचविण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
रत्नागिरीचे डॅशिंग व कार्यतत्पर पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधण्यावर भर देण्यात येणार आहे. ग्रामसभांच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांच्या समस्या, अडचणी, सुरक्षिततेशी संबंधित प्रश्न आणि कायदा-सुव्यवस्थेच्या स्थानिक बाबी जाणून घेत त्याबाबत आवश्यक मार्गदर्शन तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती दिली जाणार आहे. कायदेशीर हक्क आणि नागरिकांची कर्तव्ये, सायबर सुरक्षा, ऑनलाइन आर्थिक फसवणूक, अमली पदार्थांचे दुष्परिणाम, महिला व बालकांची सुरक्षा, वाहतूक नियम, ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षितता आणि सामाजिक सलोखा या विषयांवर विशेष जनजागृती करण्यात येणार आहे. पोलिस दलाकडून यापूर्वी राबविण्यात येत असलेल्या विविध नागरिकाभिमुख उपक्रमांनाही ‘मिशन प्रबोधन’च्या माध्यमातून एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
विविध मोहिमांचा एकत्रित धागा
‘मिशन प्रबोधन’अंतर्गत Dial 112 या आपत्कालीन सेवेसह सायबर जागृती, ‘मिशन रायझिंग फ्लॉवर्स’, ‘मिशन फिनिक्स’, ‘मिशन प्रगती’, ‘मिशन परिपूर्ती’, ‘मिशन जीवन’, ‘मिशन प्रतिसाद’, ‘मिशन RAPID’ आणि ‘मिशन TAPE for SAFE’ यांसारख्या उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविली जाणार आहे. सायबर गुन्हे आणि ऑनलाइन आर्थिक फसवणुकीपासून बचावासाठी १९३० हेल्पलाइनची माहिती देण्यात येणार आहे. अमली पदार्थांविरोधात कारवाईसोबतच प्रतिबंधात्मक जनजागृती, विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीचा संदेश, ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना तसेच नागरिकांच्या समस्या आणि तक्रारींना प्रतिसाद देण्याच्या पोलिसांच्या विविध उपक्रमांची माहिती या माध्यमातून दिली जाणार आहे. वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहन चालविताना मोबाइलवर संभाषण न करणे, मद्यपान करून वाहन न चालविणे, हेल्मेटचा वापर करणे आणि विरुद्ध दिशेने वाहन न चालविणे याबाबतही जनजागृती केली जाणार आहे.
AI आणि डिजिटल माध्यमांचाही प्रभावी वापर
‘मिशन प्रबोधन’चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर. कायदेशीर तरतुदी, सायबर सुरक्षेचे नियम, ऑनलाइन फसवणूक टाळण्याचे उपाय आणि विविध सुरक्षा विषयक माहिती नागरिकांना सहज समजेल अशा स्वरूपात पोहोचविण्यासाठी AI आधारित तंत्रज्ञान, सोशल मीडिया, व्हिडिओ, अनिमेशन, माहितीपट आणि संवादात्मक डिजिटल कंटेंटचा वापर करण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने यापूर्वीही तंत्रज्ञानाधारित पोलिसिंगला प्राधान्य दिले आहे. AI-powered RAIDS App, GIS-based बंदोबस्त App आणि रत्नसेतू AI Assistant यांसारख्या उपक्रमांद्वारे तंत्रज्ञानाचा वापर नागरिकाभिमुख पोलीस सेवेसाठी करण्यात येत आहे.
पोलीस आणि नागरिकांमधील संवादाला नवे बळ
अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन प्रबोधन’च्या माध्यमातून ग्रामसभा, शाळा-महाविद्यालये, ज्येष्ठ नागरिक आणि विविध स्थानिक घटकांशी पोलिसांचा संवाद अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर केवळ घटना घडल्यानंतर प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रतिबंधात्मक जनजागृतीला प्राधान्य देत पोलिसांचा संवाद नागरिकांच्या दारापर्यंत नेण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जाणार आहे. गावातील ग्रामसभेपासून शहरातील नागरिकांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत समाजातील विविध घटकांना सुरक्षितता, कायद्याचे ज्ञान आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न ‘मिशन प्रबोधन’च्या माध्यमातून करण्यात येणार आहे.


