(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील माध्यमिक विद्यालय वरवडे भागशाळा वाटद खंडाळा व श्रीमती पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालय वाटद खंडाळा येथे हिंद दी चादर म्हणून ओळखले जाणारे गुरु तेग बहादुर हे शौर्य, त्याग आणि धर्मरक्षणाचे तेजस्वी प्रतीक आहेत. त्यांच्या अद्वितीय बलिदानाची आठवण जिवंत ठेवण्यासाठी प्रभातफेरी शाळा ते खंडाळा बाजारपेठ दरम्यान आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी निवळी जयगड महामार्गावरून खंडाळाकडे जात असताना सकाळी कोणत्यातरी गाडीच्या धडकेने जखमी झालेला बैल रस्त्याच्या मधोमध चालता येईना म्हणुन बसलेला होता. त्यातूनच वाहतूक सुरू होती. कोणीही तिकडे लक्ष दिले नाही.
दरम्यान, तिथूनच जाणाऱ्या माध्यमिक विद्यालय वरवडे भागशाळा वाटद खंडाळा व श्रीमती पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालय वाटद खंडाळा चे क्रिडाशिक्षक डॉ.राजेश जाधव त्यांचे सहकारी शिक्षक, कॉलेजचे विदयार्थी व टेम्पो चालक चाफेरी गावचे सुदेश पवार यांनी त्या जखमी बैलाला उचलून रस्त्याच्या बाजूला सुरक्षित नेऊन ठेवले. यातून खऱ्या अर्थाने या प्रभातफेरीचा उद्देश सार्थ होऊन गुरु तेग बहादूर सिंग यांनी दिलेला एकता, बंधुता आणि मानवतेचा संदेश प्रत्येक हृदयापर्यंत पोहोचविण्याचा प्रत्यय देण्यात आला. विद्यार्थ्यानी दाखविलेल्या भुतदयेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

