(जाकादेवी / संतोष पवार)
रत्नागिरी शहरातील उज्वल शिक्षण मंडळ, रत्नागिरी संचलित (रजि.) आगम द कॉलेज ऑफ अप्लाईड आर्ट या नव्या महाविद्यालयाचा उद्घाटन सोहळा आज (1 एप्रिल) रोजी उत्साहात पार पडला. ज्येष्ठ रंगकर्मी व हबीब तन्वीर राष्ट्रीय पुरस्कार विजेते श्री. सुहास भोळे यांच्या हस्ते या महाविद्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
कोकण विभागातील विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, कलात्मक दृष्टिकोन आणि कौशल्याधारित शिक्षणाची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. कला शिक्षण केवळ छंद म्हणून न पाहता, त्यामध्ये करिअरच्या विविध संधी उपलब्ध आहेत, हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हा संस्थेचा मुख्य हेतू आहे.
ग्राफिक डिझाइन आणि कम्युनिकेशन या क्षेत्रात दर्जेदार व काळानुरूप शिक्षण देण्यासाठी अद्ययावत, सुबद्ध आणि समतोल अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून, प्रत्यक्ष कामाच्या क्षेत्रात उतरतानाच त्यांच्याकडे कलात्मक जाण आणि संगणकाधारित कौशल्यांचा समन्वय असावा, यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.
विद्यार्थी स्वावलंबी, सर्जनशील आणि कुशल कम्प्युटर ग्राफिक डिझाइनर्स बनावेत, तसेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वात कलात्मकता आणि तांत्रिक प्रावीण्याचा संगम घडवणे हे संस्थेचे ध्येय असल्याचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक प्रा. संदेश पालये यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला विनायक हातखंबकर, अॅड. महेंद्र मांडवकर, अॅड. राकेश सत्वे, नंदकुमार यादव, प्रा. पद्मजा पाटणकर, उदय शिंदे, महेंद्र सागवेकर, निलिमा शिंदे, संतोष गोरीवले, नम्रता शिंदे यांच्यासह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(फोटो : रंगकर्मी सुहास भोळे यांचे स्वागत करताना प्रा. संदेश पालये)

