(रत्नागिरी / प्रतिनिधी)
गणपती विसर्जनासाठी कुटुंबीयांसोबत गेलेल्या कुटुंबाला घरी परतल्यानंतर वडील घरात दिसून न आल्याने शोधाशोध सुरू केली. त्यानंतर घराजवळील सार्वजनिक विहिरीजवळ त्यांची चप्पल, काठी आणि मोबाईल आढळून आले. ग्रामस्थांनी विहिरीत शोध घेतला असता त्यांचा मृतदेह आढळला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. ही घटना जुवे चव्हाणवाडी येथे २५ सप्टेंबर रोजी घडली.
चंद्रशेखर विनायक चव्हाण (वय ५९, रा. जुवे चव्हाणवाडी, रत्नागिरी) असे मृताचे नाव आहे. याबाबत त्यांचे कुटुंबीय अनमोल चंद्रशेखर चव्हाण यांनी रत्नागिरी शहर पोलिसांना माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, अनमोल चव्हाण हे २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घरातील व्यक्तींसोबत गणपती विसर्जनासाठी निघाले होते. त्यावेळी त्यांचे वडील चंद्रशेखर चव्हाण हे घराच्या अंगणात बसले होते. गणपती विसर्जन करून रात्री सव्वाआठच्या सुमारास कुटुंबीय घरी परतले असता चंद्रशेखर हे घरात दिसून आले नाहीत. त्यामुळे अनमोल आणि त्यांच्या आईने त्यांचा परिसरात शोध सुरू केला. त्यावेळी घराजवळील वाडीच्या सार्वजनिक विहिरीजवळ चंद्रशेखर यांची चप्पल, हातातील काठी आणि मोबाईल आढळून आला. त्यामुळे कुटुंबीयांनी नातेवाईक तसेच वाडीतील ग्रामस्थांना याबाबत माहिती दिली.
ग्रामस्थांनी विहिरीत शोध घेतला असता काठीच्या सहाय्याने मृतदेहाचा ठाव लागला. त्यानंतर अनमोल यांचे चुलत भाऊ विनायक माख्ती चव्हाण यांनी विहिरीत उतरून चंद्रशेखर यांना बाहेर काढले. त्यांना तातडीने उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल, रत्नागिरी येथे दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांचा उपचार सुरू करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू क्रमांक १२०/२०२६, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. चंद्रशेखर चव्हाण यांचा विहिरीत पडून मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


