(रत्नागिरी /प्रतिनिधी)
टीव्ही पाहण्यासाठी घरात आलेल्या परिचित व्यक्तीने घरातील कपाटात ठेवलेल्या बॉक्समधून सोन्याचे दागिने चोरून नेल्याची तक्रार जयगड पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. १३ ते १७ ऑगस्टदरम्यान सडेवाडी, जयगड येथे ही घटना घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले असून, याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात भारतीय न्यायसंहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत तेजस्वीनी संकेत वाघधरे (वय ३५, व्यवसाय गृहिणी, रा. सडेवाडी, जयगड) यांनी जयगड पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिस नोंदीनुसार, आरोपी निलेश नारायण पाटील (वय ४५, मूळ रा. कोळंबे, सध्या रा. जयगड, सडेवाडी) हा १३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता ते १७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेपर्यंतच्या कालावधीत फिर्यादी यांच्या घरी टीव्ही पाहण्यासाठी आला होता. संशयित आरोपी घरात असताना फिर्यादी यांच्या नकळत कपाटात ठेवलेल्या बॉक्समधील सोन्याचे दागिने त्यांच्या संमतीशिवाय काढून नेण्यात आले. चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये सोन्याच्या कानातील कुड्या, पट्ट्या, साईबाबांचे दोन लॉकेट, सोन्याची चैन, अंगठी, लहान मुलांची कानातील रिंग आणि सोन्याची नथ यांचा समावेश असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या दागिन्यांची अंदाजे किंमत अनुक्रमे १२ हजार ५००, १७ हजार ५००, १२ हजार ५००, २५ हजार, ५ हजार, ५ हजार आणि १५ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी जयगड पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.


