(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मुसळधार पाऊस, खवळलेला समुद्र, रात्रंदिवसाची गस्त आणि विविध ठिकाणांवरील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी अशा आव्हानात्मक परिस्थितीत कार्यरत असलेल्या होमगार्ड जवानांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने पावसाळी रेनकोट वितरणाचा उपक्रम हाती घेतला. पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या हस्ते होमगार्ड जवानांना रेनकोटचे वितरण करण्यात आले.
पोलीस अधीक्षक कार्यालयात २४ जुलै २०२६ रोजी आयोजित मासिक गुन्हे आढावा बैठकीदरम्यान हा उपक्रम पार पडला. यावेळी अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांची प्रमुख उपस्थिती होती. पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच होमगार्ड जवानांच्या उपस्थितीत वितरणाचा कार्यक्रम उत्साहा तपार पडला. कोकणातील पावसाळा हा अत्यंत तीव्र आणि आव्हानात्मक मानला जातो. अशा काळात सागरी सुरक्षा, किनारपट्टीवरील गस्त, विविध संवेदनशील ठिकाणांवरील बंदोबस्त, नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी मदतकार्य तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या जबाबदाऱ्या पार पाडताना होमगार्ड जवानांना प्रतिकूल हवामानाचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षिततेसह कार्यक्षमतेत वाढ व्हावी, या उद्देशाने रत्नागिरी पोलीस दलाने रेनकोटचे वितरण करण्याचा निर्णय घेतला.
यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी होमगार्ड जवानांच्या सेवाभावी वृत्तीचे आणि कर्तव्यनिष्ठेचे कौतुक केले. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कोणत्याही परिस्थितीत पोलीस दलासोबत खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या होमगार्डचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले. पावसाळ्यात कर्तव्य बजावताना स्वतःच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे तितकेच आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी सर्व जवानांना दक्षता, शिस्त आणि जबाबदारीची जाणीव ठेवून सेवा बजावण्याचे आवाहन केले.

