( रत्नागिरी/ प्रतिनिधी )
स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष नौसीन काझी यांचे नाव रत्नागिरी नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ४ मध्ये जोरदार चर्चेत आले आहे. कोकण नगर, कीर्ती नगर, क्रांतीनगर, स्टेट बँक कॉलनी, नगरपरिषद कर्मचारी वसाहत व चर्मालय हा परिसर असलेल्या या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक मुसा काजी यांनी पक्षांतर करून शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केल्यानंतर या भागात पक्षाची धुरा गेल्या पाच वर्षांपासून निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून नौसीन काझी यांनी सांभाळली आहे.
कोकण नगर येथील जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नौसीन काझी हे नागरिकांच्या दैनंदिन समस्यांवर सातत्याने काम करताना दिसतात. वीज, पाणी, गटार, रस्ते या मूलभूत सोयीसुविधांबाबत वारंवार नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून नागरिकांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी त्यांनी प्रभावी भूमिका घेतली आहे. तसेच सेतू केंद्राच्या माध्यमातून नागरिकांची रेशन कार्ड, आधार कार्ड, वैद्यकीय व विविध शासकीय योजनांशी संबंधित कामे ते नियमितपणे पाहतात. इलेक्शन कार्डमध्ये नाव दुरुस्ती, पत्ता बदल, नवीन नोंदणी यासारखी कामे ते निशुल्क करून देत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये त्यांचा जनसंपर्क अधिक दृढ झाला आहे.
गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान आघाडीच्या उमेदवारांसाठी नौसीन काझी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. प्रभाग क्रमांक ४ मधून आघाडीला मिळालेल्या बहुमूल्य लीडमागे त्यांचा प्रभावी जनसंपर्क आणि कार्यक्षम संघटनशैली महत्त्वाची ठरली होती. नौसीन काझी यांनी जनतेमध्ये सतत राहून त्यांच्या अडचणी समजून घेऊन समस्यांवर ठोस भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्यांचा जनाधार दिवसेंदिवस वाढत आहे. स्थानिकांमध्ये दांडगा संपर्क, सर्वसमावेशक दृष्टीकोन आणि सातत्याने जनतेत काम करणारी प्रतिमा ही त्यांची मोठी जमेची बाजू मानली जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ४ मध्ये येणारी निवडणूक विरोधकांसाठी कठीण ठरणार, हे आता स्पष्ट झाले आहे.

