( रत्नागिरी )
कुवारबाव येथील श्री महालक्ष्मी मंडळ मैदानावर आयोजित विशाल हिंदू संमेलन उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडले. कुवारबावसह खेडशी, कारवांचीवाडी, मिरजोळे, गणेशनगर, साईनगर, पोमेंडी परिसरातील हजारो हिंदू बंधू-भगिनींच्या उपस्थितीमुळे संमेलनस्थळी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
संमेलनाची सुरुवात काजरघाटी येथील ढोल-ताशा पथकाच्या गजरात झाली. पारंपरिक वेशभूषेत विद्यार्थ्यांनी आणि महिलांनी भगवे ध्वज फडकावत भव्य प्रवेश केला. हिंदू जनजागृती समितीच्या वतीने युवतींनी लाठी-काठीचे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. पोमेंडी खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायांवरील आरती तसेच हिंदुत्व गीतावर नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली.
इस्कॉनचे निमाईचंद्र दास यांनी अर्जुन-श्रीकृष्ण संवादाच्या माध्यमातून कर्तव्य, धर्म आणि जीवनमूल्यांवर प्रभावी प्रबोधन केले. क्रीडा भारतीच्या कार्यकर्त्या सौ. नेत्रा राजेशिर्के यांनी ‘पंचपरिवर्तन’ या विषयावर मार्गदर्शन करत समाजपरिवर्तनाची सुरुवात स्वतःपासून करण्याचे आवाहन केले. समरसता, कुटुंब प्रबोधन, स्वभाषा, स्वभूषा, स्वभोजन, पर्यावरण संरक्षण, जलसंरक्षण आणि वृक्षारोपण या कृतींची अंमलबजावणी आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
रा. स्व. संघाचे कोकण प्रांत कार्यवाह विठ्ठल कांबळे यांनी हिंदू परंपरांचे महत्त्व स्पष्ट करत “हिंदुत्व म्हणजे मानवता धर्म” हा संतांचा संदेश पुन्हा जागवण्याची गरज व्यक्त केली. मेकॉले शिक्षणपद्धतीमुळे भारतीय ज्ञानपरंपरेबद्दल न्यूनगंड निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले आणि जात-पात भेद विसरून समाज एकत्र येण्याचे आवाहन केले.
प्रशांत कदम यांनी हिंदू समाजासमोरील आंतरिक आव्हानांवर भाष्य करत एकत्रितपणे त्यावर मात करण्याची गरज अधोरेखित केली. रत्नागिरी आणि नाशिक येथील काही घटनांचा संदर्भ देत त्यांनी सामाजिक बदलांविषयी चिंता व्यक्त केली.
संमेलनाचे कोषाध्यक्ष वरदराज पंडित यांनी प्रास्ताविकात सनातन हिंदू धर्माचे जागतिक महत्त्व अधोरेखित केले. वैचारिक आणि सांस्कृतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी संघटित होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. जागरण, एकत्रीकरण आणि सशक्तीकरण या उद्देशाने संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. कीर्ती मोडक यांनी केले. संयोजक मारुती आंब्रे यांनी संमेलनामुळे पंचक्रोशीत हिंदू एकतेला बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करत सर्व उपस्थितांचे आभार मानले.

