(चिपळूण /रत्नागिरी)
उक्ताड येथील कालभैरव मंदिर परिसरात जावयाला मारहाण होत असल्याचे पाहून मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या सासऱ्यालाही मारहाण करून धमकी दिल्याची घटना २० सप्टेंबर रोजी मध्यरात्री घडली. याप्रकरणी चौघांविरोधात चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, याबाबत सुभाष बाजी लोटेकर (वय ६४, व्यवसाय सेवानिवृत्त, रा. उक्ताड, कालभैरव मंदिराशेजारी) यांनी फिर्याद दिली आहे. लोटेकर हे त्यांचे जावई समीर काकडे, चालक कृष्णा काळे आणि क्लिनर ओंकार चव्हाण यांच्यासह कालभैरव मंदिर, उक्ताड येथून गणेश मंदिराच्या दिशेने पायी जात होते. रामभाऊ गोरीवले यांच्या घराजवळ ते आले असता दोन मोटारसायकलींवरून काही जण तेथे आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
फिर्यादीनुसार, आरोपी आयुष अनिल शिंदे, पार्थ राकेश शिंदे आणि आर्यन अनिल शिंदे हे ॲक्टिव्हा (एमएच ०८ बीए ४३७८) आणि बुलेट (एमएच १२ एक्सएस ६१६४) या वाहनांवरून आले. त्यांनी समीर काकडे यांना हाताने मारहाण करण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे. जावयाला सोडविण्यासाठी लोटेकर मध्ये गेले असता नितीन रामचंद्र शेळके याने त्यांच्या कानाखाली मारून त्यांना बाजूला ढकलल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यानंतर समीर काकडे यांच्या डाव्या डोळ्याच्या बाजूस हातातील कड्याने मारहाण करण्यात आल्याचा आरोप असून, शिवीगाळ करून धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेत दुखापत झाल्याने लोटेकर यांनी पोलिसांत धाव घेतली.
या प्रकरणी आयुष अनिल शिंदे, पार्थ राकेश शिंदे, आर्यन अनिल शिंदे आणि नितीन रामचंद्र शेळके (सर्व रा. कोळकेवाडी, ता. चिपळूण) यांच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ११५(२), ११८(१), १२६(२), ३५२, ३५१(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


