(रत्नागिरी /प्रतिनिधी)
शहरातील नायबनगर, कोकणनगर परिसरात कुत्र्यांच्या पिल्लांना अज्ञात व्यक्तीने विषारी पदार्थ खायला घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा पदार्थ खाल्ल्यानंतर पिल्लांना वेदना व यातना झाल्याचे तसेच त्यापैकी एका पिल्लाचा मृत्यू झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मोहम्मद सैफ समीर काझी (वय २६, व्यवसाय चालक, रा. फ्लॅट क्रमांक जे/००१, सनराईज रेसिडेन्सी, नायबनगर, कोकणनगर, रत्नागिरी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. २० सप्टेंबर रोजी रात्री ११.३० वाजण्यापूर्वी सनराईज रेसिडेन्सी जे/००१ जवळील परिसरात हा प्रकार घडला. अज्ञात व्यक्तीने तेथील कुत्र्यांच्या पिल्लांसाठी कोणत्यातरी विषारी पावडरीसदृश पदार्थ खाण्यास टाकल्याचा आरोप आहे. हा पदार्थ खाल्ल्यानंतर पिल्लांना त्रास होऊन वेदना व यातना झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यापैकी एका पिल्लाचा मृत्यू झाल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकारामुळे परिसरातील प्राणीप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत असून, पिल्लांना विषारी पदार्थ कोणी दिला, याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच उपलब्ध माहितीच्या आधारे अज्ञात व्यक्तीचा शोध घेतला जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ मधील कलम ३२५ तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० मधील कलम ११(१)(a) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलिसांकडून सुरू आहे.


