(रत्नागिरी /प्रतिनिधी)
शहरातील मच्छीमार्केट परिसरात मध्यरात्री पोलिसांनी कारवाई करत ब्राऊन हेरॉईनसदृश अंमली पदार्थासह दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सुमारे ७ ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ, १८२ पुड्या आणि एक मोबाईल फोन असा एक लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी व अंमलदार रत्नागिरी शहर पोलिस ठाणे परिसरात शासकीय वाहनाने पेट्रोलिंग करीत होते. माळनाका एसटी स्टँड, झारणी रोड तसेच मच्छीमार्केट परिसरात गस्त घालत असताना २१ सप्टेंबर रोजी पहाटे सुमारे १.३५ वाजता मच्छीमार्केट येथील चर्चसमोरील रस्त्यावर संशयास्पद हालचाल आढळून आली. नुरमोहमद दिलमोहमद खान ऊर्फ कल्लू (वय २५, रा. भाजी मार्केटसमोर, बाजारपेठ, रत्नागिरी) आणि मस्तान मगदम शेख (वय २६, रा. अजगावकरवाडी, बाजारपेठ, रत्नागिरी) यांच्याकडे तपासणी केली असता पारदर्शक प्लास्टिक पिशवीत ब्राऊन हेरॉईनसदृश अंमली पदार्थ आढळून आला.
या पदार्थाचे निव्वळ वजन सात ग्रॅम असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. तो १८२ छोट्या पुड्यांमध्ये असल्याचे तपासात आढळले. एका पुडीची किंमत ५०० रुपये असल्याने पदार्थाची अंदाजे किंमत ९१ हजार रुपये असल्याचे पोलिस नोंदीत नमूद आहे. याशिवाय अंमली पदार्थ ठेवण्यासाठी वापरलेली प्लास्टिकची पिशवी, १८२ लहान कागदी पुड्या आणि २० हजार रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी पोहेकॉ दिपराज प्रकाश पाटील (वय ३९, नेमणूक—स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली आहे. रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क) आणि २१(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंमली पदार्थाची विक्री करण्याच्या उद्देशाने तो ताब्यात बाळगल्याचा आरोप पोलिसांनी केला असून, जप्त करण्यात आलेल्या पदार्थाबाबत पुढील तपास व कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.


