(चिपळूण)
कै. सिताराम नारायण देशपांडे यांच्या १२५व्या जयंती महोत्सवानिमित्त कृतज्ञता मंच, दुर्गेवाडी (ता. चिपळूण) आणि रत्नागिरी जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ यांच्या संकल्पनेतून दिला जाणारा जिल्हास्तरीय ‘क्रीडारत्न पुरस्कार २०२५’ परशुराम एज्युकेशन सोसायटी, चिपळूणच्या युनायटेड इंग्लिश स्कूलचे क्रीडाशिक्षक श्री. समीर चंद्रकांत कालेकर यांना जाहीर झाला आहे.
या पुरस्कारासाठी जिल्हाभरातून २६ क्रीडा शिक्षकांनी आपापल्या कार्याचा अहवाल समितीकडे सादर केला होता. त्यामधून क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल श्री. कालेकर यांची निवड करण्यात आली.
हा पुरस्कार शुक्रवार, दिनांक ५ सप्टेंबर २०२५ रोजी शिक्षक दिना निमित्त साई मंदिर हॉल, गोडाऊन स्टॉप, नाचणे (ता. जि. रत्नागिरी) येथे कृतज्ञता मंचाचे अध्यक्ष श्री. शांताराम देशपांडे, ॲड. प्रसाद देशपांडे (मुंबई हायकोर्ट), जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. विजय शिंदे, श्री. राहुल टोपले (अध्यक्ष मिशन ऑरगॅनिक एग्रीकल्चर, चंदगड), तसेच रत्नागिरी जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष श्री. उदयराज कळंबे व सचिव श्री. राजेश जाधव यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
श्री. कालेकर हे एक उत्कृष्ट क्रीडाशिक्षक असून कबड्डीचे नामांकित राष्ट्रीय पंच आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली युनायटेड इंग्लिश स्कूलमधील अनेक खेळाडूंनी राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले आहे. सध्या ते चिपळूण तालुका क्रीडा समन्वयक म्हणून जिल्हा क्रीडा कार्यालय, रत्नागिरीमार्फत कार्यरत आहेत.
या पुरस्कारामध्ये रोख रक्कम रुपये पाच हजार, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ यांचा समावेश आहे. श्री. कालेकर यांच्या या यशाबद्दल जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष श्री. उदयराज कळंबे, उपाध्यक्ष प्रसाद शिवणेकर, श्री. सत्यवान धोत्रे, सचिव श्री. राजेश जाधव व खजिनदार श्री. संजीव मोरे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

