(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता नगरसेवकांच्या ३२ जागांसाठी ११३ उमेदवारांचे रिंगण तयार झाले आहे. एकूण १९ उमेदवारांनी निवडणूक प्रक्रियेतून माघार घेतल्यापैकी तब्बल १८ जण अपक्ष तर एक उमेदवार उद्धव ठाकरे गटाचा असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली. नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेल्या सात अर्जांपैकी तौफिका मजगावकर यांचा अर्ज छाननीत बाद झाल्याने आता सहा उमेदवार आमने-सामने येणार आहेत. नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत आम आदमी पक्षाच्या सुश्मिता शिंदे, उद्धवसेनेच्या शिवानी सावंत माने, शिंदे गटाच्या शिल्पा सुर्वे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या वहिदा मुर्तुझा, तसेच अपक्ष उमेदवार प्राजक्ता किणे व संध्या कोसुंबकर यांच्यात चुरस रंगणार आहे.
दरम्यान, नगरपरिषदेतील १६ प्रभागांतील ३२ जागांसाठी १३२ अर्ज दाखल झाले होते. गुरुवारी चार आणि शुक्रवारी माघारीचा शेवटचा दिवस आणखी १५ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. यामध्ये १४ अपक्ष उमेदवारांसह एका उद्धवसेना उमेदवाराचा समावेश आहे. निवडणूक रिंगणातून बाहेर पडलेल्यांमध्ये हीना बावानी, श्रेया शिंदे, रफिक मुकादम, कल्पना मसूरकर, श्रीकृष्ण तळेकर, करण नागवेकर, विभव पटवर्धन, अभिलाष पिलणकर, सोमनाथ पिलणकर, प्राजक्ता रूमडे, श्वेता कोरेगांवकर, नितीन माईण, प्रणाली रायकर आणि कामना बेग यांचा समावेश आहे. अर्ज माघारीनंतरचे हे अंतिम चित्र पाहता रत्नागिरीत यंदाची निवडणूक अधिक चुरशीची आणि राजकीय समीकरणे पालटणारी ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
देवरुखात ९ अर्ज मागे, ७० रिंगणात
देवरुख नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये ९ जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. अर्ज माघारीच्या अंतिम दिवसानंतर १८ जागांसाठी ७० उमेदवार रिंगणात राहिले आहेत. नगराध्यक्षपदासाठी ५ अर्ज, तर नगरसेवकपदासाठी ६५ अर्ज शिल्लक राहिले आहेत. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्रेया केदारी यांच्याबरोबर नगरसेवकपदासाठी इशिता कांगणे, संतोष कृष्णा केदारी, सूरज रेडीज, अर्चना कदम, सुभाष कोटकर, वसंत तावडे, मनोज तावडे, अजय गजबार या सर्व अपक्षांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेतले.
राजापूर नगराध्यक्षपदासाठी ३, तर नगरसेवकपदासाठी ५१ उमेदवार रिंगणात
राजापूर नगरपरिषद निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी एकूण ८ उमेदवारांनी माघार घेतली आहे. यामध्ये नगराध्यक्ष पदाच्या शीतल सुनील पटेल यांच्यासह नगरसेवक पदासाठीचे ७ उमेदवार सामील आहेत. त्यामुळे आता नगराध्यक्षपदासाठी ३ तर नगरसेवकपदासाठी ५१ असे एकूण ५४ उमेदवार रंगणार आहेत. नगराध्यक्षपदासाठी ज्योती सुनील खटावकर, हुस्नबानू निजामुद्दीन खलिफे आणि श्रुती श्रीकांत ताम्हनकर यांच्यात त्रिकोणी लढत होणार आहे. १० प्रभागांच्या २० जागांपैकी ११ ठिकाणी तिरंगी तर ९ ठिकाणी दुरंगी अशी लढत आकार घेत आहे.
खेड नगराध्यक्ष पदासाठी ३ उमेदवार; नगरसेवकपदासाठी ४६ जण रिंगणात
खेड नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात अर्ज मागे घेण्यात आले. नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेल्या ५ उमेदवारांपैकी तेजल प्रेमल चिखले आणि वैभवी वैभव खेडेकर यांनी माघार घेतल्याने आता ३ उमेदवारांची लढत उरली आहे. नगरसेवक पदासाठी दाखल झालेल्या ८२ अर्जांपैकी १७ अवैध, तर १७ उमेदवारांनी माघार घेतल्याने एकूण ४६ उमेदवार २० जागांसाठी रिंगणात कायम राहिले आहेत. अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये जयमाला पाटणे, रुपाली खेडेकर, अनिल सदरे, अक्षता दळवी, अब्दुल घरटे, वैजेश सागवेकर, आशा सनगरे, संदेश भुवड, मन्सुर मुकादम, जावेद कौचाली, प्रेरणा देसाई, भालचंद्र साळवी, प्रीती माजलेकर, आनम चौगुले, वसंत पिंपळकर, जागृती लंबाडे यांचा समावेश आहे.
लांजा नगरसेवक पदासाठी ५७, नगराध्यक्ष पदासाठी ५ उमेदवार रिंगणात
लांजा नगरपंचायतीच्या निवडणुकीत अर्ज माघारीच्या दोन दिवसांत ११ नगरसेवक आणि एका नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराने माघार घेतली आहे. १७ प्रभागांतील १७ जागांसाठी दाखल झालेल्या ८० अर्जांपैकी छाननीत १२ बाद, तर ११ जणांनी माघार घेतल्याने ५७ उमेदवार अंतिम रिंगणात राहिले आहेत. नगरसेवक पदासाठी फरजीन नाईक, केशव गुरव, मेधा सुर्वे यांच्यासह भालचंद्र कांबळे, सुजित भुर्के, मुग्धा चांदोरकर, प्रमोद करुप, सुहेल मापारी, मंगेश लांजेकर, अशोक कातकर यांनी अर्ज मागे घेतले. नगराध्यक्षपदासाठी दाखल ७ अर्जांपैकी छाननीत एक अर्ज बाद झाला होता, तर चेतना कांबळे यांनी माघार घेतल्याने आता ५ उमेदवार रिंगणात आहेत. शिंदेसेनेच्या सावली कुरुप, उद्धवसेनेच्या पूर्वा मुळे आणि भाजपच्या बंडखोर अपक्ष प्रियांका यादव यांच्यात मुख्य लढत होणार आहे.
गुहागर नगराध्यक्षपदासाठी ४, सदस्यपदासाठी ४४ उमेदवार रिंगणात
गुहागर नगरपंचायत निवडणुकीत अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी शिंदेसेनेच्या मयूरी मूकनाक यांनी नगराध्यक्षपदाचा अर्ज मागे घेतला, तर १० सदस्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. यामुळे आता नगराध्यक्षपदासाठी ४ आणि सदस्यपदासाठी ४४ उमेदवार अंतिम रिंगणात आहेत. नगराध्यक्षपदासाठी नीता मालप (भाजप), पारिजात कांबळे (उद्धवसेना), सुजाता बागकर (राष्ट्रवादी अजित पवार गट) आणि सुप्रिया वाघधरे (अपक्ष) यांच्यात चुरस रंगणार आहे. सदस्यपदासाठी उमेदवारी मागे घेणाऱ्यांमध्ये योगिनी शिरधनकर, राकेश साखरकर, सिद्धी शेटे, विशाखा जाधव, नरेश पवार, मंगेश जोशी, साहील आरेकर, सौरभ भागडे, रवींद्र ठोंबरे आणि प्रज्ञा जांगळी यांचा समावेश आहे.
चिपळूण नगराध्यक्ष पदासाठी ७, तर नगरसेवक पदासाठी ११० उमेदवार रिंगणात
चिपळूण नगरपरिषद निवडणुकीत अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी १२ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी ७ आणि २८ नगरसेवक जागांसाठी तब्बल ११० उमेदवार शर्यतीत कायम राहिले आहेत. यामुळे चिपळूणची निवडणूक बहुरंगी स्वरूप धारण करणार आहे. नगराध्यक्षपदाच्या लढतीत काँग्रेसमधील नाट्यमय घडामोडी लक्षवेधक ठरल्या. तालुकाध्यक्ष लियाकत शहा यांना अपक्ष म्हणून उभे राहावे लागले असून, शिंदेसेनेतून काँग्रेसमध्ये गेलेले सुधीर शिंदे हे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार ठरले. चिपळूणमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप, समाजवादी पार्टी अशा सात पक्षांमध्ये लढत रंगणार असून १९ अपक्ष उमेदवार मैदानात आहेत. नगराध्यक्षपदासाठी उमेश सकपाळ (युती), राजेश देवळेकर (उद्धवसेना), रमेश कदम (राष्ट्रवादी SPC), सुधीर शिंदे (काँग्रेस), मोईन पेचकर (समाजवादी पार्टी) तसेच अपक्ष निशिकांत भोजने व लियाकत शहा हे उमेदवार रिंगणात आहेत. नगरसेवक पदासाठी इशरद गोठे, श्रीराम शिंदे, रिजवान सुर्वे, नईम खाटीक, सुनील खेडेकर, सीमा रानडे, भक्ती कुबडे, मृणाल घटे आणि महेंद्र सावंत यांनी अर्ज मागे घेतला.

