(रत्नागिरी / प्रतिनिधी)
बुद्धधम्माच्या प्रसाराचा इतिहास केवळ भिक्षूंच्या योगदानापुरता मर्यादित नाही. बुद्धकालीन भिक्षुणींनी ज्ञान, करुणा आणि समतेचा विचार समाजापर्यंत पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पुढे माता रमाई यांच्या त्यागातून आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीत महिलांच्या सहभागातून या विचारपरंपरेला नवी दिशा मिळाली. स्त्रियांचे हे योगदान समजून घेतल्याशिवाय बुद्धधम्म चळवळीचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही, असे प्रतिपादन धम्ममित्र उमा संतोष गमरे यांनी केले.
भीमक्रांती मंडळ, माता रमाई महिला मंडळ पंचशील आणि प्रीतम गृहनिर्माण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (११ ऑक्टोबर) पंचशील बुद्ध विहार, रेल्वे स्थानकाजवळ, रत्नागिरी येथे वर्षावास प्रवचनमालेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ‘बुद्धकालीन स्त्रिया ते बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कालखंडातील स्त्रियांचे बुद्धधम्म चळवळीतील योगदान’ या विषयावर उमा गमरे यांनी उपस्थितांना संबोधित केले.
समाजव्यवस्थेत स्त्रियांना अनेक सामाजिक मर्यादांना सामोरे जावे लागत होते. अशा परिस्थितीत गौतमी प्रजापती यांनी स्त्रियांना संघप्रवेशाचा मार्ग खुला होण्यासाठी केलेले प्रयत्न आणि भिक्षुणी संघाची स्थापना हा स्त्रियांच्या धार्मिक व सामाजिक प्रगतीतील महत्त्वाचा टप्पा ठरला. खेमा आणि उप्पलवण्णा यांसारख्या विदुषी भिक्षुणींनी प्रज्ञा, साधना आणि धम्मज्ञानाच्या बळावर आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले. त्यांच्या जीवनातून स्त्रीच्या बौद्धिक क्षमतेची आणि आध्यात्मिक सामर्थ्याची जाणीव होते, असे गमरे यांनी स्पष्ट केले. स्त्रियांच्या योगदानाचा हा प्रवास पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतही दिसून येतो.
बाबासाहेबांनी स्त्री-पुरुष समानतेला सामाजिक न्यायाच्या व्यापक संकल्पनेशी जोडले. स्त्रियांना शिक्षण, स्वाभिमान, हक्क आणि निर्णयस्वातंत्र्य मिळाल्याशिवाय समताधिष्ठित समाजाची निर्मिती शक्य नाही, हा त्यांच्या विचारांचा गाभा होता. त्यामुळे धम्मचळवळ ही केवळ धार्मिक परिवर्तनाची प्रक्रिया नसून सामाजिक विषमता दूर करण्याची आणि मानवी प्रतिष्ठा प्रस्थापित करण्याची चळवळ असल्याचे गमरे यांनी अधोरेखित केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनप्रवासात माता रमाई यांनी दिलेली साथ, सहन केलेले कष्ट आणि त्याग यांचे स्मरण करताना स्त्रियांच्या योगदानाकडे केवळ पूरक भूमिका म्हणून पाहता येणार नाही, हा विचारही प्रवचनातून मांडण्यात आला. सामाजिक परिवर्तनाच्या प्रत्येक टप्प्यावर स्त्रियांनी कुटुंब, समाज आणि चळवळ यांना जोडण्याचे काम केले. आजच्या पिढीने या इतिहासातून प्रेरणा घेऊन शिक्षण, संघटन, विवेकशीलता आणि समतेचा विचार दैनंदिन जीवनात रुजविण्याची गरज आहे, असे आवाहन उमा गमरे यांनी केले.
वर्षावास प्रवचनमालेच्या माध्यमातून बुद्धविचारांचा अभ्यास, ऐतिहासिक योगदानाचे स्मरण आणि वर्तमानातील सामाजिक प्रश्नांवर चिंतन करण्याची संधी उपस्थितांना मिळाली. स्त्री-पुरुष समानता, मानवी प्रतिष्ठा आणि धम्मातील करुणा व प्रज्ञेची मूल्ये प्रत्यक्ष आचरणात आणणे, हाच या विचारमंथनाचा महत्त्वपूर्ण संदेश ठरला आहे.


