(राजापूर / रत्नागिरी)
घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने दरवाजाचा कडी-कोयंडा हत्याराने उचकटून घरात प्रवेश केला आणि लोखंडी व लाकडी कपाटांसह तिजोरी उघडून तब्बल ६ लाख ५० हजार १८५ रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना पाचल, विद्यानगर येथे उघडकीस आली. यामध्ये सोन्याचे विविध दागिने, चांदीचे पैंजण आणि रोख रकमेचा समावेश आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात राजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मुसाअल्ली गुलाब पिरजादे (वय ५६, व्यवसाय शिक्षक, तळसवडे हायस्कूल, रा. पाचल, विद्यानगर, ता. राजापूर; मूळ रा. नवे पारगाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली आहे. १२ सप्टेंबर रोजी दुपारी २.३० ते २१ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२.१५ वाजण्याच्या दरम्यान ही घरफोडी झाल्याचे समोर आले. अज्ञात व्यक्तीने घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा कोणत्यातरी हत्याराने उचकटला. त्यानंतर घरात प्रवेश करून लोखंडी व लाकडी कपाटांचे दरवाजे तसेच तिजोरी उघडण्यात आली. त्यातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन चोरटा पसार झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये सुमारे साडेचार तोळे वजनाचे सोन्याचे घडण, एक तोळा वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट, सोन्याचे व डायमंडचे मंगळसूत्र, डायमंडचे कानातील टॉप्स, लहान सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याचे टॉप्स, हार, कलर स्टोन्स नेकलेस, सोन्याच्या रिंगा आणि चांदीच्या पैंजणाचा समावेश आहे. याशिवाय १२ हजार रुपये रोख चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद आहे.
चोरीस गेलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची किंमत आणि रोख रक्कम मिळून एकूण नुकसान ६ लाख ५० हजार १८५ रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. दागिन्यांच्या खरेदीच्या पावत्या व बिलांचे क्रमांकही फिर्यादी पिरजादे यांनी पोलिसांना दिले आहेत. या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम २०५(क), ३३१(३) आणि ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरफोडी व चोरीच्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.


