(सोलापूर / वृत्तसंस्था)
पंढरपूर तालुक्यात उतारवयातील प्रेमसंबंधाचा कथितरित्या रक्तरंजित शेवट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंबादास खांडेकर (वय ७०) आणि मंगल होनमाने यांच्यात गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. दोघांमध्ये झालेल्या वादातून अंबादास यांची हत्या करण्यात आल्याचा संशय असून, या प्रकरणी मंगल होनमाने यांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांच्या तपासानुसार, साधारण २७ जुलै रोजी अंबादास खांडेकर आणि मंगल होनमाने यांच्यात वाद झाला. या वादातून शेतात अंबादास यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर मृतदेह शेतात नेऊन अर्धवट जाळण्यात आला आणि पुरण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. भांडणाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून त्याचा सखोल तपास सुरू आहे.
दरम्यान, २ ऑगस्ट रोजी गावातील काही नागरिकांना शेतात अर्धवट जळालेल्या अवस्थेतील पुरलेला मृतदेह आढळला होता. त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी फॉरेन्सिक टीमच्या मदतीने घटनास्थळाची पाहणी करून मृतदेहाची ओळख पटवण्यास सुरुवात केली. मात्र, मृतदेहाची ओळख पटवणे पोलिसांसमोर आव्हान होते.
प्राथमिक तपासात अंबादास खांडेकर बेपत्ता असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांच्या दोन्ही मुलींचे डीएनए नमुने घेऊन मृतदेहाशी त्यांची जुळवणी करण्यात आली. या डीएनए तपासणीतून मृतदेह अंबादास यांचाच असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या बारा तासांत मंगल होनमाने यांना अटक केल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांच्या तपासात अंबादास आणि मंगल यांच्यात गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचे समोर आले आहे. याच प्रेमसंबंधातून झालेल्या किरकोळ वादानंतर मंगल यांनी अंबादास यांची हत्या केल्याचे तपासात पुढे आले आहे. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळण्यात आल्याचेही तपासात समोर आले आहे.
या घटनेचा खुलासा मृतदेहाच्या डीएनए तपासणीनंतर झाला. अंबादास यांच्या बेपत्ता होण्यापासून मृतदेहाची ओळख पटेपर्यंत पोलिसांनी विविध बाजूंनी तपास केला. त्यानंतर मंगल होनमाने यांच्याकडे चौकशी करण्यात आली. कसून चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे सांगण्यात आले आहे.
या प्रकरणातील भांडणाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


