(नवी दिल्ली)
आरोग्य सेवा महासंचालनालय (DGHS) यांनी फिजिओथेरपिस्टसाठी महत्त्वाचा आदेश जारी करताना स्पष्ट केले आहे की, फिजिओथेरपिस्ट आपल्या नावासमोर ‘डॉक्टर’ (Dr.) ही उपाधी वापरू शकत नाहीत. ते वैद्यकीय डॉक्टर नसल्याचे DGHS ने नमूद केले आहे.
९ सप्टेंबर रोजी डीजीएचएसच्या संचालक डॉ. सुनिता शर्मा यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनचे (IMA) राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. दिलीप भानूशाली यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, “फिजिओथेरपिस्ट हे प्रशिक्षित वैद्यकीय डॉक्टर नाहीत. त्यामुळे त्यांनी नावासमोर ‘डॉ.’ लिहू नये. यामुळे रुग्ण आणि सर्वसामान्यांची दिशाभूल होते.”
त्यांनी पुढे स्पष्ट केले की, फिजिओथेरपिस्टना प्राथमिक वैद्यकीय प्रॅक्टिस करण्याचा अधिकार नाही. ते फक्त वैद्यकीय डॉक्टरांनी रेफर केलेल्या रुग्णांवरच उपचार करू शकतात. तसेच त्यांना मेडिकल कंडिशनचे निदान करण्याचे प्रशिक्षण मिळालेले नसल्याने चुकीचे उपचार होऊन गंभीर गुंतागुंत होऊ शकते.
न्यायालयीन आदेशांचा दाखला
पत्रात पटना आणि मद्रास उच्च न्यायालयांच्या आदेशांचा दाखला देण्यात आला आहे. तसेच मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने (MCI) देखील याआधीच फिजिओथेरपिस्ट व ऑक्युपेशनल थेरपिस्टना ‘डॉ.’ ही उपाधी वापरण्यास मनाई केली होती.
NC AHP चा निर्णय रद्द
दरम्यान, एप्रिलमध्ये नॅशनल कमिशन फॉर अलाइड अँड हेल्थ प्रोफेशन्स (NCAHP) यांनी फिजिओथेरपिस्टना ‘डॉ.’ ही उपाधी वापरण्याची परवानगी दिल्याचे जाहीर केले होते. त्यावेळी २०२५ साली नवीन करिक्युलम लाँच करताना हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र DGHS ने आता तो निर्णय रद्द केला आहे.
उल्लंघन केल्यास कारवाई
DGHS ने स्पष्ट केले की, डॉक्टर ही उपाधी फक्त नोंदणीकृत मॉडर्न मेडिसिन, आयुर्वेद, होमिओपॅथी आणि युनानी प्रॅक्टिशनर्सना वापरण्याची परवानगी आहे. वैद्यकीय क्षेत्रातील इतर कोणालाही ही उपाधी वापरण्याचा अधिकार नाही. उल्लंघन झाल्यास IMA च्या कलम ६, ६(अ) आणि ७ अंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

