(तेहरान / वृत्तसंस्था)
अमेरिका आणि तिच्या मित्रदेशांसोबतचा संघर्ष अद्याप संपलेला नसून पश्चिम आशियातील तणाव वाढल्यास दीर्घकाळ चालणाऱ्या संघर्षाला सामोरे जाण्यासाठी इराण पूर्णपणे तयार असल्याचा दावा इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’ने (आयआरजीसी) सोमवारी केला.
‘अल-आलम न्यूज नेटवर्क’ला दिलेल्या मुलाखतीत आयआरजीसीचे ब्रिगेडियर जनरल हुसेन मोहेब्बी यांनी इराणी सैन्याने ‘दीर्घकालीन युद्धासाठी’ तयारी केल्याचे सांगितले. “आमच्या दृष्टीने युद्ध हे युद्धच असते; त्याचे वेगवेगळे टप्पे असतात, पण ते अजून संपलेले नाही. आयआरजीसीने स्वतःला दीर्घकालीन युद्धासाठी तयार केले आहे. जर संघर्षाची तीव्रता वाढली, तर आम्ही आमचे रक्षण करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहोत,” असे मोहेब्बी म्हणाले.
अमेरिका आणि इस्रायल या संघर्षातील आपल्या उद्दिष्टांमध्ये अपयशी ठरल्याचा दावाही मोहेब्बी यांनी केला. “अमेरिका आणि इस्रायली राजवटीचा हा ऐतिहासिक आणि लाजीरवाणा पराभव आहे. मात्र, हा पराभव स्वीकारण्याचे धैर्य अमेरिकेकडे नाही. अमेरिकेतील काही लष्करी आणि राजकीय तज्ज्ञही या अपयशाची कबुली देत आहेत,” असे त्यांनी म्हटले.
अमेरिकेच्या कथित अपयशाचे उदाहरण देताना मोहेब्बी यांनी ‘हॉर्मुझच्या सामुद्रधुनी’चा उल्लेख केला. जगातील सर्वात मोठे नौदल असूनही आणि ऊर्जा वाहतुकीची सुरक्षा राखण्याचा दावा करूनही अमेरिका ही सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्यात अपयशी ठरल्याचे त्यांनी सांगितले. “सुरक्षा देण्याचा दावा करणारा देश स्वतःच सुरक्षेसाठी धोका बनला आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर या संघर्षाला सुरुवात झाली होती. त्यानंतर जुलै महिन्यात अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर इराणने पश्चिम आशियातील अमेरिकन तळांना लक्ष्य केले. त्याच काळात इराणने हॉर्मुझची सामुद्रधुनी सर्व सागरी वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केली असून, या सामुद्रधुनीवर आजही इराणचेच नियंत्रण असल्याचे नमूद करण्यात आले आहे.


