(ठाणे / वृत्तसंस्था)
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एस्कॉर्ट पथकात गेल्या तीन वर्षांपासून कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक विजय सांगडे यांचे कर्तव्य बजावत असताना निधन झाले. ते 57 वर्षांचे होते. सोमवारी सकाळी ठाणे येथे ड्युटीसाठी आल्यानंतर ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहात त्यांना अचानक छातीत दुखू लागले आणि चक्कर आली. त्यानंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
विजय सांगडे हे डोंबिवलीतील पलावा सिटी येथे कुटुंबासह राहत होते. मिळालेल्या माहितीनुसार, विजय सांगडे हे नेहमीप्रमाणे आज सकाळी ठाण्यातील कोर्ट नाका येथील शासकीय विश्रामगृहात ड्युटीवर हजर झाले होते. त्यांच्या निधनाची माहिती समोर आल्यानंतर पोलीस दलात हळहळ व्यक्त करण्यात आली. त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी जुन्नर येथे नेण्यात आले आहे.
दिवंगत पोलीस उपनिरीक्षक विजय सागंडे यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. ठाण्यातील सिव्हिल रुग्णालय परिसरात ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने मानवंदना देत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी पोलीस उपायुक्त परिमंडळ-1 बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ-5 प्रशांत कदम यांच्यासह इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, सांगडे यांचे पार्थिव डोंबिवलीतील मानपाडा मंदिराजवळील शिव मल्हार आर्केड येथील त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आले होते. पार्थिव घरी पोहोचण्यापूर्वीच नातेवाईक, मित्रमंडळी आणि इमारतीतील रहिवासी मोठ्या संख्येने जमा झाले होते. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली.
सांगडे यांचा मोठा मुलगा सिक्युरीटी फोर्समध्ये कार्यरत असून लहान मुलगा पोलीस अकॅडमी चालवतोय. वडिलांच्या आकस्मिक निधनामुळे दोन्ही मुलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


