(मुंबई / वृत्तसंस्था)
४० लाख रुपयांच्या लाचखोरीच्या प्रकरणात सीबीआयने 21 सप्टेंबर रोजी उत्तराखंडमधील ऋषिकेश येथून सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्सचे (CGST) अतिरिक्त आयुक्त आणि वरिष्ठ आयआरएस (IRS) अधिकारी विनय कुमार कंठेती यांना अटक केली. ठाण्यातील विशेष सीबीआय न्यायालयाने यापूर्वी कंठेती यांच्यासह अन्य दोन आरोपींची अटक बेकायदेशीर ठरवत त्यांना जामीन मंजूर केला होता. मात्र, उच्च न्यायालयाने हा आदेश रद्द केल्यानंतर कंठेती फरार झाले होते.
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने रायगड येथील कार्यालयातून CGST अधीक्षक राकेश कुमार सिन्हा आणि खासगी व्यक्ती नरिंदर राजपूत यांना तातडीने ताब्यात घेतले. मात्र, कंठेती तेथून पसार होण्यात यशस्वी झाले. त्यानंतर त्यांनी अटक टाळण्यासाठी मुंबईहून दिल्ली गाठली आणि तेथून बसने ऋषिकेशमधील दुर्गम भागातील एका होमस्टेमध्ये आश्रय घेतला. संशय येऊ नये म्हणून त्यांनी मोबाईल फोन पूर्णपणे बंद ठेवला होता. केवळ एका मेसेजिंग ॲपच्या माध्यमातून ते आपल्या जवळच्या एका सहकाऱ्याच्या संपर्कात होते.
सीबीआयच्या तांत्रिक तपास पथकाने कंठेती यांचे लोकेशन शोधून काढले. त्यानंतर ऋषिकेशमधील संबंधित होमस्टेवर छापा टाकून त्यांना ताब्यात घेण्यात आले.
हे प्रकरण दगड-खाण (स्टोन-मायनिंग) व्यवसायाशी संबंधित आहे. संबंधित कंपनीच्या जीएसटी (GST) आणि रॉयल्टी देयकांशी संबंधित प्रकरण निकाली काढण्यासाठी आरोपी अधिकाऱ्यांनी सुरुवातीला 1.5 कोटी रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. त्यानंतर झालेल्या वाटाघाटींमध्ये ही रक्कम 40 लाख रुपयांवर निश्चित करण्यात आली.
या प्रकरणात सीबीआयने 27 ऑगस्ट रोजी सापळा रचला. रायगड कार्यालयात अधिकाऱ्यांच्या वतीने 40 लाख रुपयांची लाच स्वीकारताना नरिंदर राजपूत यांना रंगेहात पकडण्यात आले. त्याच दिवशी कंठेती आणि राकेश कुमार सिन्हा यांनाही त्यांच्या कार्यालयातून अटक करण्यात आली होती.
28 ऑगस्ट रोजी सीबीआयने तिन्ही आरोपींना ठाण्यातील विशेष न्यायालयात हजर करून पाच दिवसांची कोठडी मागितली. मात्र, न्यायालयाने ही मागणी फेटाळून अटक बेकायदेशीर ठरवली आणि तिन्ही आरोपींची जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिले. त्यानंतर सीबीआयने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.
16 सप्टेंबर रोजी उच्च न्यायालयाने ठाणे न्यायालयाचा आदेश रद्द करून तिन्ही आरोपींना दोन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली. या निर्णयाला कंठेती यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, त्यांची याचिकाही फेटाळण्यात आली. त्यानंतर सीबीआयने कंठेती यांचा शोध सुरूच ठेवला आणि अखेरीस सोमवारी ऋषिकेश येथे त्यांना अटक करण्यात यश मिळवले.


