(बारामती / वृत्तसंस्था)
तालुक्यातील पणदरे येथील एमआयडीसी परिसरात गर्भवती महिलेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वैशाली तानाजी पवार असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणाचा तपास करताना माळेगाव पोलिसांनी अवघ्या दोन तासांत संशयित आरोपीला ताब्यात घेत अटक केली. गणेश रामचंद्र माने (वय २६, रा. पणदरे, ता. बारामती) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी मृत महिलेची सासू रंजना लक्ष्मण पवार यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तानाजी पवार आणि त्यांची पत्नी वैशाली हे पणदरे एमआयडीसी परिसरात राहत होते. घटनेच्या दिवशी सायंकाळी साडेसातच्या सुमारास तानाजी पवार रडत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी त्यांच्या जवळच्या कुटुंबीयांना दिली. त्यानंतर घरात जाऊन पाहणी केली असता वैशाली रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी अवस्थेत आढळून आल्या.
घटनेची माहिती मिळताच माळेगाव पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत परिसरातील नागरिकांकडे चौकशी सुरू केली. तपासादरम्यान गणेश माने याच्याबाबत पोलिसांना माहिती मिळाली. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
शारीरिक संबंधाच्या उद्देशाने घरात प्रवेश
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, शारीरिक संबंध ठेवण्याच्या उद्देशाने गणेश माने याने वैशाली यांच्या घरात प्रवेश केला. महिलेने विरोध केल्यानंतर आरोपीने त्यांच्या डोक्यावर हातोड्याने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर त्यांच्यावर जबरदस्ती केल्याचे तपासात समोर आले आहे.
महिलेने विरोध केल्यानंतर तसेच या घटनेची माहिती इतरांना कळू नये, या उद्देशाने आरोपीने टॉवेलच्या साहाय्याने त्यांचा गळा आवळल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर आरोपीने महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि पायातील पैजण काढून नेल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.
शवविच्छेदनात महिला गर्भवती असल्याचे स्पष्ट
वैशाली यांच्या शवविच्छेदनादरम्यान त्या गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या डोक्यावर, मानेवर तसेच गुप्तांगावर गंभीर दुखापती आढळून आल्याचे वैद्यकीय तपासणीत समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेला हातोडा, घटनेच्या वेळी त्याने परिधान केलेले कपडे तसेच मृत महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र आणि पैजण जप्त केले आहेत. आरोपीला अटक करून पोलीस कोठडी घेण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर माळेगाव पोलिसांनी तपासाला तातडीने सुरुवात केली. तांत्रिक विश्लेषण आणि उपलब्ध माहितीच्या आधारे अवघ्या दोन तासांत गणेश माने याला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ करीत आहेत.


