(रत्नागिरी /प्रतिनिधी)
मुंबई–गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामादरम्यान वाहतूक व्यवस्थापनाचा पुन्हा एकदा बोजवारा उडाल्याचे चित्र कारवांचीवाडीजवळ पाहायला मिळाले. कोणतीही पूर्वसूचना अथवा पुरेशी वाहतूक व्यवस्था नसताना अचानक डायव्हर्जन करण्यात आल्याने दोन्ही दिशांची वाहने एकाच मार्गिकेवर आली आणि सोमवारी २१ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली. या प्रकारामुळे महामार्गावरील कामाच्या नियोजनावर आणि वाहनचालकांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
कारवांचीवाडी परिसरात मार्गिकेवर किरकोळ काम सुरू असताना वाहतूक सुरक्षितपणे बायपास मार्गावर वळविण्याची शक्यता असतानाही अचानक एकाच मार्गिकेवरून दोन्ही दिशांची वाहतूक सुरू करण्यात येत असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. परिणामी समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज घेणे अवघड होत असून, वाहनचालकांची अक्षरशः तारांबळ उडत आहे. याच वाहतूक नियोजनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी दुपारी दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असली तरी महामार्गावरील काम सुरू असताना वाहनचालकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे का? असा सवाल या घटनेनंतर उपस्थित होत आहे.
महामार्ग विकासाच्या नावाखाली वाहनचालकांच्या जीविताशी प्रयोग करण्याची वेळ येऊ नये. संबंधित यंत्रणांनी केवळ कामाच्या प्रगतीकडे न पाहता वाहतूक सुरक्षेचीही नियमित पाहणी करावी. करवांचीवाडी परिसरातील डायव्हर्जन व्यवस्था तातडीने तपासून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
डायव्हर्जन की धोक्याचा सापळा?
महामार्गाचे काम सुरू असताना डायव्हर्जन करणे अपरिहार्य असू शकते; मात्र त्यासाठी योग्य दिशादर्शक फलक, बॅरिकेडिंग, पुरेशी प्रकाशयोजना, वाहतूक नियोजन आणि आवश्यक ठिकाणी मनुष्यबळ उपलब्ध असणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात करवांचीवाडी परिसरातील अचानक करण्यात येणाऱ्या वाहतूक बदलांमुळे वाहनचालकांना परिस्थितीचा अंदाज घेण्यास पुरेसा वेळ मिळत नसल्याची तक्रार पुढे येत आहे. ‘काम सुरू आहे’ या एका कारणाखाली वाहतूक व्यवस्थेच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करता येणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया वाहनचालकांकडून व्यक्त होत आहे.
ठेकेदाराच्या कामावर अंकुश कोणाचा?
करवांचीवाडी परिसरातील कामाची जबाबदारी असलेल्या रवी इन्फ्रा बिल्ड कंपनीच्या वाहतूक व्यवस्थापनाबाबत आता प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे. कामाच्या ठिकाणी वाहतूक कशी वळवायची, कोणत्या मार्गिकेवरून वाहने सोडायची आणि त्यासाठी आवश्यक सुरक्षा उपाय कोणते, याबाबत स्पष्ट नियोजन असणे आवश्यक आहे. मात्र अचानक कुठेही वाहतूक वळविणे, एकाच मार्गिकेवरून दोन्ही दिशांची वाहतूक सोडणे आणि त्यानंतर निर्माण होणाऱ्या गोंधळाचा सामना वाहनचालकांनी करणे, हा प्रकार योग्य वाहतूक व्यवस्थापनाचा भाग कसा मानायचा, असा सवाल आता उपस्थित होत आहे.


