( रत्नागिरी/ प्रतिनिधी )
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांनंतर आता रत्नागिरी जिल्ह्यातील नगर परिषद व नगर पंचायतींच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर सात नगर परिषद आणि नगर पंचायतींसाठी प्रारूप प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. नव्या आराखड्यानुसार रत्नागिरी आणि चिपळूणमध्ये प्रत्येकी एक प्रभाग आणि दोन नगरसेवक, तर राजापूर आणि खेडमध्ये तीन प्रभाग आणि तीन नगरसेवकांची वाढ होणार आहे.
या रचनेसंदर्भातील प्रक्रिया १८ ते २४ जुलै दरम्यान राबवली जाणार असून, त्यानंतर २५ ते २९ जुलै या कालावधीत प्रस्ताव नगर विकास विभागाकडे पाठविण्यात येईल. २९ जुलैला हा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे.
१८ ते २१ ऑगस्ट दरम्यान नागरिकांकडून हरकती व सूचना मागवण्यात येणार असून, २२ ऑगस्ट ते १ सप्टेंबर यावेळेत त्या हरकतींवर सुनावणी होणार आहे. २ ते ८ सप्टेंबर या कालावधीत अंतिम अहवाल तयार केला जाईल. अखेर, ३० सप्टेंबर २०२५ रोजी राज्य निवडणूक आयोगाकडून अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाणार आहे.
प्रभाग वाढ कुठे?
- रत्नागिरी (ब वर्ग) व चिपळूण (ब वर्ग): प्रत्येकी १ प्रभाग, २ नगरसेवकांची वाढ
- राजापूर (क वर्ग) व खेड (क वर्ग): प्रत्येकी ३ प्रभाग, ३ नगरसेवकांची वाढ
- गुहागर, देवरुख, लांजा (नगर पंचायती): प्रभाग संख्या अपरिवर्तित
ग्रामीण व नागरी निवडणुकांची तयारी जोमात
दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठीच्या प्रारूप प्रभाग रचनेनंतर आता नगरपरिषद निवडणुकीसंदर्भातही हालचाली सुरू झाल्या आहेत. विशेषतः गुहागर तालुक्यातील गट आणि गण संख्येत वाढ झाली असून, ग्रामविकास विभागाच्या पुढाकारामुळे ही प्रक्रिया अधिक गतिमान झाली आहे. नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुकांची रणनीती ठरवण्यासाठी राजकीय पक्षांचीही लगबग सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसांत नगर राजकारणात नव्या समीकरणांची शक्यता वर्तवली जात आहे.