(दापोली /रत्नागिरी)
दाभोळ एसटी स्थानक परिसरात रात्रीच्या वेळी एका टपरीच्या मागे स्वतःचे अस्तित्व लपवून संशयास्पदरीत्या थांबलेल्या २३ वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. चोरी करण्याच्या उद्देशाने तो परिसरात दबा धरून बसल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, त्याच्याविरोधात महाराष्ट्र पोलिस अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २० सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ९.४५ वाजता दाभोळ एसटी स्टँड येथील एका टपरीच्या मागे एक तरुण संशयास्पद स्थितीत आढळून आला. रात्रीच्या वेळी स्वतःचे अस्तित्व लपवून तो तेथे थांबलेला होता. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता, त्या ठिकाणी उपस्थित राहण्याबाबत तसेच त्याचे नाव व गाव याबाबत त्याने समाधानकारक माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे पोलिसांच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी दाभोळ सागरी पोलिस ठाण्यातील पोकॉ दैवत दिलीप राणे (बक्कल क्रमांक ९३७) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार राजेशकुमार योगेंद्र प्रसाद गौतम (वय २३, रा. फुलवारिया, ता. गोपालपूर, जि. संत कबीरनगर, उत्तर प्रदेश) याच्याविरोधात महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ मधील कलम १२२(क) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी संशयास्पदरीत्या वावरताना आढळलेल्या या तरुणाच्या हालचालींबाबत पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे. दाभोळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.


