(संगमेश्वर /प्रतिनिधी)
आरवली–करजुवे आंतरजिल्हा मार्गावरून भरधाव वेगाने जात असताना मोटारसायकल घसरून झालेल्या अपघातात २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात १८ सप्टेंबर रोजी सकाळी सव्वादहाच्या सुमारास सरंद-बुरंबाड सीमेवर घडला. याप्रकरणी संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुषार शंकर मुझे (वय २२, रा. बुरंबाड, मुझेवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) हा आपल्या ताब्यातील एफ. झेड. मोटारसायकल क्रमांक एमएच ०८ एटी ५७७९ घेऊन बुरंबाड ते माखजन असा प्रवास करीत होता. १८ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे १०.१५ वाजता तो आरवली–करजुवे मार्गावरील सरंद-बुरंबाड हद्दीत आला असता मोटारसायकल अतिवेगाने चालविल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. रस्त्याची परिस्थिती आणि वाहतुकीच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून मोटारसायकल बेदरकारपणे व अतिवेगाने चालविल्याचा आरोप पोलिसांनी नोंदविला आहे. त्यानंतर मोटारसायकल घसरून अपघात झाला. या दुर्घटनेत तुषार मुझे याला गंभीर दुखापती झाल्या. उपचारादरम्यान अथवा अपघातातील दुखापतींमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिस नोंदीत नमूद आहे. अपघातात मोटारसायकलचेही नुकसान झाले.
या प्रकरणी उमेश विलास गायकवाड (वय ४५, पोहेकॉ/८९४, नेमणूक संगमेश्वर पोलिस ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संगमेश्वर पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम २८१, १०६(१), १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताची नोंद करून संगमेश्वर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


