(दापोली / रत्नागिरी)
दापोली उपजिल्हा रुग्णालय परिसरात सुरू असलेल्या नव्या इमारतीच्या बांधकामासह मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना बसत आहे. रुग्णालयाच्या पार्किंग परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने तेथे तात्पुरत्या तलावाचे स्वरूप निर्माण झाले असून, रुग्णालयात ये-जा करणेही अनेकांसाठी कष्टदायक ठरत आहे.
रुग्णालय परिसरात पावसाच्या पाण्याचा प्रभावी निचरा होण्यासाठी आवश्यक व्यवस्था नसल्याने पार्किंगमध्ये पाणी साचत असल्याचे चित्र आहे. परिणामी रुग्ण, नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांना पाण्यातून मार्ग काढत रुग्णालयात प्रवेश करावा लागत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, लहान मुले आणि गंभीर आजारांवरील उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले. वाहनधारकांनाही पार्किंगमध्ये वाहने उभी करताना अडचणींचा सामना करावा लागत असून, पाण्यामुळे परिसरात चिखल निर्माण झाल्याने घसरून अपघात होण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.
सध्या कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयासारख्या अत्यावश्यक सेवांच्या ठिकाणी पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत राहणे अपेक्षित असताना, दापोली उपजिल्हा रुग्णालयातील परिस्थितीमुळे नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. रुग्णांना होणारी गैरसोय लक्षात घेऊन साचलेल्या पाण्याचा तातडीने निचरा करावा, पार्किंग परिसरातील जलनिकासी व्यवस्था सक्षम करावी आणि बांधकामामुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करून रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांना सुरक्षित व सुलभ प्रवेश मिळेल, यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

