(दापोली)
दापोली–दाभोळ राज्य महामार्गावर चिखलगाव येथील सृष्टी हॉलिडे होम्सजवळ बुधवारी सकाळी आयशर टेम्पो आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात तीन अल्पवयीन तरुण गंभीर जखमी झाले. या घटनेची नोंद दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिसांनी पालकांना अल्पवयीन मुलांच्या हाती वाहने देऊ नयेत, असे स्पष्ट आवाहन केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सचिन गजानन गुरव हे आयशर टेम्पो (MH 12 SX 9529) घेऊन दापोलीहून गुहागरच्या दिशेने जात होते. सकाळी सुमारे साडेनऊ वाजण्याच्या सुमारास चिखलगाव नजीक समोरून येणाऱ्या दुचाकीने (MH 01 EH 3060) टेम्पोच्या उजव्या बाजूच्या टायरला जोरदार धडक दिली.
या अपघातात दुचाकीवरील आर्यन संदीप सोलकर, सौरभ सतीश सोलकर आणि सागर संदीप जाधव हे तिघेही गंभीर जखमी झाले. प्राथमिक माहितीनुसार, हे तिन्ही तरुण १६ वर्षांखालील असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच दाभोळ सागरी पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अपघाताच्या पार्श्वभूमीवर विनापरवाना आणि अल्पवयीन मुलांकडून वाहन चालवणे अत्यंत धोकादायक असल्याची चिंता पोलिसांनी व्यक्त केली आहे. कायद्याने परवानगी मिळेपर्यंत मुलांना वाहने चालवू देऊ नयेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश दौलत कादवडकर करत असून, दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

