(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथील प्रा. आबा सावंत कला व वाणिज्य महाविद्यालयातर्फे ६ जुलै २०२६ रोजी विद्यार्थ्यांसाठी भात लावणी प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या वतीने आयोजित या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना पारंपरिक शेती संस्कृतीची ओळख करून देत श्रमसंस्कार आणि शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावून देणे हा होता.
कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रसाद झेपले यांनी विद्यार्थ्यांना भातशेतीचे महत्त्व, आधुनिक शेती पद्धतींसह पारंपरिक शेतीचे मूल्य आणि कृषी संस्कृतीचे जतन करण्याची गरज याविषयी मार्गदर्शन केले.
यानंतर विद्यार्थ्यांनी पूर्ये तर्फे देवळे येथील शेतकरी शंकर वैद्य यांच्या शेतात प्रत्यक्ष पाणथळीत उतरून भाताची रोप काढणी, भात लावणी तसेच ट्रॅक्टर चालविण्याचा अनुभव घेतला. विद्यार्थ्यांनी उत्साहात आणि आनंदी वातावरणात भात लावणी केली. विशेष म्हणजे महाविद्यालयातील विद्यार्थिनींनीही शेतात उतरून कौशल्यपूर्ण सहभाग नोंदवत शेतीतील श्रमांचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवले.
या उपक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. शिल्पा वैद्य यांनी केले. शेतकरी शंकर वैद्य यांनी आपल्या शेतामध्ये लावणीसाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शेती, पर्यावरण संवर्धन आणि श्रमसंस्कारांविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला. महाविद्यालयाचे संस्थाध्यक्ष प्रा. आबा सावंत तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक आणि उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली.

