(राजापूर/ रत्नागिरी)
पुणे–राजापूर एसटी बसमधून प्रवास करत असताना महिलेने रॅकवर ठेवलेल्या बॅगेतून तब्बल २ लाख ६२ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. २० सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा ते सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी राजापूर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३०५(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौ. अनजा प्रशांत कांबळे (वय ३२, मूळ रा. पासार्डे, ता. करवीर, जि. कोल्हापूर, सध्या रा. जैतापूर, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) या २० सप्टेंबर रोजी पुणे–राजापूर एसटी बस क्रमांक एमएच १४ बीटी २२७२ मधून कोल्हापूर ते राजापूर असा प्रवास करीत होत्या. प्रवासादरम्यान त्यांनी आपली व्हीनस कंपनीची काळ्या रंगाची बॅग बसमधील रॅकवर ठेवली होती. राजापूर तालुक्यात आल्यानंतर बॅग तपासली असता त्यातील सोन्याचे दागिने आढळून आले नाहीत. अज्ञात इसमाने फिर्यादीच्या परवानगीशिवाय लबाडीच्या उद्देशाने बॅगेतून दागिने चोरून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
चोरीला गेलेल्या ऐवजामध्ये १ लाख ७५ हजार रुपये किमतीचे २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, ३५ हजार रुपये किमतीचे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दोन टॉप्स, ३५ हजार रुपये किमतीची ५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन आणि १७ हजार ५०० रुपये किमतीची २.५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, अशा एकूण २ लाख ६२ हजार ५०० रुपये किमतीच्या दागिन्यांचा समावेश आहे. या घटनेमुळे एसटी बसमधील प्रवाशांच्या मौल्यवान वस्तूंच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. चोरी करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्याचे आव्हान राजापूर पोलिसांसमोर असून, बसमधील प्रवासादरम्यान नेमक्या कोणत्या ठिकाणी हा प्रकार घडला, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.


