(संगमेश्वर / मकरंद सुर्वे)
संगमेश्वर तालुक्यातील कडवई तुरळ परिसरातून कत्तलीसाठी गुरांची वाहतूक होत असल्याचे वृत्त एका दैनिकात कालच प्रसिद्ध झाले होते. तात्काळ दुसऱ्याच दिवशी गोरक्षकांनी तुरळ येथे गुरांची कत्तलीसाठी अवैध वाहतूक करणारी गाडी पकडून तात्काळ पोलीसांच्या स्वाधीन केल्याने या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे.
संगमेश्वर तालुक्यातील कडवई तुरळ परिसरातून कत्तलीसाठी जनावरांची अवैधरित्या विक्री व वाहतूक केली जात असल्याचे वृत्त आल्यावर येथील गोरक्षक पुन्हा एकदा ऍक्शन मोडवर आले होते. काल मंगळवारी येथील गोरक्षक मिलिंद चव्हाण यांना चिपळूण(कळवंडे) येथून कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक होणार असल्याचे समजले. तात्काळ श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष मनसेचे जितेंद्र चव्हाण, मिलिंद चव्हाण, आरवली येथील गोरक्षक मंदार पिळणकर, सुजाण पिळणकर, चिपळूण येथील अजय जाधव, ऋषींकेश खानविलकर, शिंदेंसेनेचे उपतालुकाप्रमुख स्वरूप साळवी, राहुल हाडमनी,या गोरक्षकांनी पाळत ठेऊन बुधवारी पहाटे साडेतीन वाजता चिपळूण(कळवंडे) येथून मलकापूरकडे कत्तलीसाठी बैल घेऊन जाणारी आयसचर गाडी क्रमांक एम एच ०९ सी यु ३५६३ तुरळ येथे पकडली.
सदरची गाडी ही महादेव गावडे (हुपरी)यांच्या मालकीची असून या गाडीत भरत कोलापटे (चांदोली) या व्यापाऱ्यांने कळवंडे येथील दिनेश सावर्डेकर यांच्याकडून खरेदी केलेले सहा बैल होते. सदरचे बैल हे कत्तलीसाठी जात असल्याची माहिती चालक सलमान पठाण( मलकापूर) यांनी दिली. गुरांच्या गाडीचा पाठलाग होत असल्याचे लक्षात येताच सोबत दुसऱ्या कारमध्ये असणाऱ्या भरत कोलापटे यांनी तिथून पळ काढला. तर गाडीमधील एक इसमानेही जंगलात पळ काढला.
या घटनेची खबर जितेंद्र चव्हाण यांनी संगमेश्वर पोलिसांना दिली. संगमेश्वर पोलीस स्टेशन चे सहायक पोलिस निरीक्षक विवेक साळवी व हेडकॉन्स्टेबल वैभव चौघुले यांनी घटनास्थळी येत गाडी व चालकाला ताब्यात घेतले. यावेळी तुरळ पोलीस पाटील वर्षा सुर्वे उपस्थित होत्या. यापुढे या भागातून असे कृत्य घडून आल्यास सबंधितांना आपल्या स्टाइलने उत्तर दिले जाईल असा इशारा गोरक्षकांच्या वतीने देण्यात आला आहे.
गुरांची गाडी माखजन पोलीस स्टेशन ला गेल्यानंतर त्यांना गाडीतून उतरऊन पोलिसांनी त्यांच्या चारापाण्याची व्यवस्था केली असून पुढील कार्यवाही सुरू आहे. सदर प्रकरणात गुरांची विक्री करणारे दिनेश सावर्डेकर व व्यापारी भरत कोलापटे यांच्यावर यापूर्वीही ही अवैध रित्या जनावरे वाहतुकीचा गुन्हा दाखल असल्याचे समजते .
(फोटो : पकडलेल्या गुरांच्या गाडीसह पोलीस व गोरक्षक)

