(संगमेश्वर)
कोकण रेल्वे मार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील घाटीवळे परिसरात रेल्वे ट्रॅकच्या लगत असलेल्या गटारात एका अनोळखी अंदाजे २५ वर्षे वयाच्या नेपाळी तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आज (रविवारी) सकाळी सुमारे ७.४५ वाजता ही घटना उघडकीस आली. मृत तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने कवटी फुटून मेंदू बाहेर आल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे.
घटनेची माहिती पोलीस पाटील दीपक लक्ष्मण कांबळे यांनी साखरपा पोलीस ठाण्याला दिल्यानंतर साखरपा पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, सहाय्यक पोलीस फौजदार शांताराम पंदेरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय करंडे आणि पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील कांबळे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन मृतदेहाची पाहणी केली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला आहे.
मृत तरुणाच्या खिशात एक चेकबुक सापडले असून त्यावर “लक्ष्मी गिरी साम दिलमया गिरी” असे नाव नमूद आहे. मात्र, मृताची निश्चित ओळख अद्याप पटलेली नाही. देवरुखचे पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या आहेत.
मृत तरुणाची उंची अंदाजे ५ फूट ५ इंच असून रंग गोरा आहे. त्याने जीन्स पॅन्ट आणि काळ्या रंगाचा फुल शर्ट घातलेला होता. जिल्ह्यात कामासाठी आलेल्या नेपाळी नागरिकांबाबत माहिती असलेल्या व्यक्तींनी किंवा ज्या ठिकाणी नेपाळी कामगार कार्यरत आहेत, त्यांनी साखरपा किंवा देवरुख पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
या घटनेचा तपास साखरपा पोलीस करत असून मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.

