(पुणे / वृत्तसंस्था)
पुण्याजवळील लोहगडावरील केतन अग्रवाल हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी अखेर ५०५३ पानी आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रातून केतन अग्रवालच्या हत्येशी संबंधित अनेक महत्त्वाचे खुलासे झाले आहेत. केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी मिळून लोहगडावर त्याचा काटा काढल्याचे आरोपपत्रातून समोर आले आहे. केतन, सिया आणि चेतन लोहगडावर गेल्याचे सीसीटीव्ही फुटेज यापूर्वी समोर आले होते. मात्र, केतनला लोहगडावरील दरीत नेमके सिया की चेतन यापैकी कोणी ढकलले, हा प्रश्न कायम होता. आता आरोपपत्रातून या घटनेबाबतचा तपशील समोर आला आहे.
केतन अग्रवाल हत्याकांडात पोलिसांनी त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना अटक केली होती. दोघांची पोलिसांकडून स्वतंत्रपणे अनेक वेळा चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान सियाने चेतनने केतनला लोहगडावरून खाली ढकलल्याचे पोलिसांना सांगितले होते. दुसरीकडे, चेतनने चौकशीत केतनला सियाने लोहगडावरून ढकलल्याचे सांगितले. त्यामुळे केतनला नेमके कोणी दरीत ढकलले, याबाबत प्रश्न निर्माण झाला होता. आता दाखल झालेल्या आरोपपत्रातून या घटनेची माहिती समोर आली आहे.
आरोपपत्रानुसार, १८ जूनला सिया गोयल आणि केतन अग्रवाल लोहगडावर गेले होते. त्यांच्यापूर्वी चेतन अग्रवाल हा लोहगडावर पोहोचला होता. ठरल्याप्रमाणे तो लोहगडावरील मंदिरात जाऊन बसला होता. घटनास्थळी पोहोचल्यानंतर सिया बुटाची लेस बांधण्यासाठी खाली बसली आणि त्याच वेळी तिने चेतनला इशारा केला. त्यानंतर सियाने केतनच्या पायावर लाथ मारली. त्यामुळे केतन अस्थिर झाला.
आरोपपत्रातील माहितीनुसार, केतनचे पाय हवेत राहतील अशा पद्धतीने त्याला धक्का देण्याचा सिया आणि चेतनचा प्लॅन होता. ठरल्याप्रमाणे सियाने केतनच्या पायावर लाथ मारल्यानंतर तो अस्थिर झाला. हे पाहताच चेतनने केतनला दरीच्या दिशेने ढकलले. त्यानंतर केतन खोल दरीत कोसळला.
घटना घडल्यानंतर ठरल्याप्रमाणे सियाने सर्वांना केतन आणि ती सेल्फी घेत असताना त्याचा पाय घसरला आणि तो लोहगडावरील दरीत कोसळल्याचे सांगितले. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी पाच प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाबही नोंदवून घेतले आहेत. त्यामुळे ५०५३ पानी आरोपपत्रातून लोहगडावरील केतन अग्रवाल हत्याकांडातील घटनाक्रमाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
‘माही’ नावाचे बनावट सोशल मीडिया खाते
केतन अग्रवाल हत्याकांडातील महत्त्वाचा दुवा ठरलेले ‘माही’ नावाचे बनावट सोशल मीडिया खाते पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. सियाला वाढदिवसाचे सरप्राईज देण्याच्या बहाण्याने केतनला लोहगड किल्ल्यावर बोलावण्यासाठी या खात्याचा वापर करण्यात आल्याचे आरोपपत्रातील खुलाशांनुसार समोर आले आहे. याच लोहगडावर केतनची हत्या करण्यात आली.
आरोपपत्रानुसार, हत्येचे पूर्वीचे प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर सिया, चेतन आणि त्यांचा मित्र रितेश हांगे यांनी केतनला संपवण्यासाठी नवीन योजना आखली. त्यांच्या ओळखीच्या एका मुलीचा फोटो वापरून ‘माही’ नावाचे बनावट सोशल मीडिया खाते तयार करण्यात आले. १८ जून रोजी या खात्यावरून केतनच्या मोबाईलवर संदेश पाठवण्यात आला. त्यात ‘माही’ ही सियाची खास मैत्रीण असल्याचे सांगत लोहगड किल्ल्यावर सियाचा वाढदिवस साजरा करण्याची योजना असल्याचे नमूद करण्यात आले होते. सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने तिच्यासोबत गुपचूप किल्ल्यावर यावे, असेही या संदेशातून सांगण्यात आले होते.
केतनने या बनावट खात्यावरून आलेल्या संदेशावर विश्वास ठेवला आणि सियासोबत लोहगड किल्ल्याकडे रवाना झाला. मात्र, वाढदिवसाच्या सरप्राईजच्या नावाखाली त्याला लोहगडावर बोलावण्यामागे त्याची हत्या करण्याचा कट असल्याचे आरोपपत्रातील तपासातून समोर आले आहे.
पूर्वनियोजित योजनेनुसार चेतन चौधरी किल्ल्याच्या बाहेर पडण्याच्या मार्गाने आधीच शिखरावर पोहोचला होता. तो किल्ल्यावरील मंदिरात केतनची वाट पाहत थांबला होता. केतन आणि सिया घटनास्थळी पोहोचल्यानंतर सियाने डोळ्यांनी चेतनला इशारा केल्याचे आरोपपत्रात नमूद आहे. गुन्ह्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने ‘माही’ नावाचे बनावट खाते कायमचे डिलीट करण्यात आल्याचेही आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. पु
महाराष्ट्रातील वडगाव मावळ न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात या प्रकरणाशी संबंधित विविध पुरावे समाविष्ट करण्यात आले आहेत. यामध्ये संदेश, फोटो, मोबाईल फोन डेटा, कॉल डिटेल रेकॉर्ड, साक्षीदारांचे जबाब, तांत्रिक विश्लेषण प्रमाणपत्रे आणि पाच प्रत्यक्षदर्शींचे जबाब यांचा समावेश आहे.
आरोपपत्रातील माहितीनुसार, केतनच्या हत्येपूर्वी सियाने गेल्या वर्षी मार्चमध्ये लोहगडमध्ये घडलेल्या अशाच प्रकारच्या दुसऱ्या घटनेबाबत ऑनलाइन माहिती गोळा केली होती. याशिवाय केतनच्या हत्येपूर्वी आरोपीने खुनाशी संबंधित चित्रपट पाहिले, ऑनलाइन संशोधनासाठी चॅटजीपीटी (ChatGPT) या एआय टूलचा वापर केला आणि पोलिसांना कसे टाळावे यासंदर्भातील पॉडकास्ट ऐकले होते, अशी माहितीही आरोपपत्रात देण्यात आली आहे.


