(नवी दिल्ली)
डेंग्यू, झिका आणि चिकुनगुनियासारख्या जीवघेण्या आजारांचा वाढता धोका लक्षात घेऊन टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी गुगलने आता डासांवर नियंत्रण मिळवण्यासाठी एक अनोखी आणि अत्याधुनिक मोहीम हाती घेतली आहे. गुगलची मूळ कंपनी ‘अल्फाबेट’ अमेरिकेतील कॅलिफोर्निया आणि फ्लोरिडा राज्यांमध्ये तब्बल ३ कोटी २० लाख विशेष नर डास सोडण्याच्या तयारीत आहे. वाचायला हे आश्चर्यकारक वाटत असले, तरी हा प्रकल्प डेंग्यूसारख्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या आधुनिक जैवतंत्रज्ञानावर आधारित आहे.
‘डिबग’ प्रकल्पातून डासांवर नियंत्रण
अल्फाबेटच्या लाईफ सायन्सेस विभागाने ‘डिबग’ नावाचा विशेष प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पात डेंग्यू, झिका आणि चिकुनगुनिया पसरवणाऱ्या ‘एडिस इजिप्ती’ या डासांच्या प्रजातीला लक्ष्य करण्यात आले आहे. या मोहिमेत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डेटा अॅनालिटिक्स आणि प्रगत जैवतंत्रज्ञानाचा वापर करून लाखो नर डासांची निर्मिती केली जाते.
‘वोल्बाकिया’ जीवाणूमुळे थांबणार डासांची पैदास
वैज्ञानिक संशोधनानुसार, फक्त मादी डास मानवांना चावतात, तर नर डास चावत नाहीत. गुगल याच तत्त्वाचा वापर करत आहे. या मोहिमेत सोडण्यात येणाऱ्या नर डासांना ‘वोल्बाकिया’ नावाच्या नैसर्गिक जीवाणूने संक्रमित केले जाते. हे नर डास मादी डासांशी प्रजनन करतात, मात्र या जीवाणूमुळे अंडी विकसित होत नाहीत. परिणामी, पुढील पिढ्यांमध्ये डासांची संख्या नैसर्गिकरीत्या झपाट्याने कमी होऊ लागते. विशेष म्हणजे हे नर डास मानवांना चावत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना कोणताही धोका नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
अमेरिकेकडे ३.२ कोटी डास सोडण्याची परवानगी मागितली
गुगलच्या ‘डिबग’ प्रकल्पाने अमेरिकेच्या पर्यावरण संरक्षण संस्थेकडे (EPA) दोन वर्षांत दरवर्षी १.६ कोटी याप्रमाणे एकूण ३.२ कोटी डास सोडण्याची परवानगी मागितली आहे. ‘फेडरल रजिस्टर’मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार, या प्रस्तावावर सध्या पुनरावलोकन सुरू असून ५ जूनपर्यंत जनतेकडून हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
रासायनिक फवारणीपेक्षा सुरक्षित पर्याय?
गुगलच्या मते, सध्या डास नियंत्रणासाठी वापरली जाणारी रासायनिक कीटकनाशके पर्यावरणासाठी घातक ठरत आहेत. तसेच कालांतराने डासांमध्ये या औषधांविरोधात प्रतिकारशक्तीही विकसित होत आहे. याउलट, ‘वोल्बाकिया’ तंत्रज्ञानावर आधारित ही पद्धत अधिक अचूक, पर्यावरणपूरक आणि दीर्घकालीन परिणाम देणारी असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
सिंगापूरमध्ये प्रयोग ठरला यशस्वी
हा प्रयोग पूर्णपणे नवा नाही. याआधी सिंगापूर सरकारच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवण्यात आला होता. तिथे डेंग्यू नियंत्रणात सकारात्मक परिणाम दिसून आल्याचे सांगितले जाते. ‘डिबग’ प्रकल्पाचे प्रमुख लिनस अप्सन यांनी सांगितले की, “सिंगापूरमधील यशामुळे आमचा आत्मविश्वास वाढला आहे. जगातील डेंग्यूचा जवळपास ७० टक्के भार आशियाई देशांवर आहे. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होऊ शकतो.”

