( मुंबई )
दिवाळीपूर्वीच एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना ६ हजार रुपयांचा दिवाळी बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा बोनस लवकरच कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मात्र एसटी कर्मचाऱ्यांना अधिकच्या बोनसची अपेक्षा होती.
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलनाची हाक दिली होती. प्रसंगी संपावर जाण्याची भूमिकाही घेण्यात आली होती. आजपासून आझाद मैदानावर सुरू झालेल्या धरणे आंदोलनादरम्यान, कृती समितीचे प्रतिनिधी, मंत्री प्रताप सरनाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक झाली.
बैठकीत मान्य झालेल्या मागण्या :
- १२,५०० रुपये सणउचल
- सरासरी ७,५०० रुपयांचा वेतनवाढ फरक हप्ता (प्रति महिना)
- ६,००० रुपये दिवाळी भेट रक्कम (बोनस)
राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की सध्या आर्थिक परिस्थिती चांगली नसली तरी दिवाळीपूर्वी प्रलंबित मागण्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी २०१८ पासून न दिलेला महागाई भत्ता (DA) तसेच २०२० ते २०२४ या कालावधीतला वेतनवाढ फरक देण्याची मागणी केली होती. त्या मागण्या अजून प्रलंबित आहेत. मात्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे संघटनांनी सांगितले.

