(मुंबई / वृत्तसंस्था)
खासगी आराम बससेवांकडे वळणाऱ्या प्रवाशांना पुन्हा एसटीकडे आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात लवकरच स्वमालकीच्या २०० अत्याधुनिक वातानुकूलित व्होल्वो बस दाखल होणार आहेत. सुरक्षितता, आरामदायी प्रवास, आधुनिक तंत्रज्ञान आणि दर्जेदार प्रवासी सेवेचा संगम या नव्या सेवेत असेल, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. एसटी महामंडळाच्या ताफ्यात एवढ्या मोठ्या संख्येने व्होल्वो बस प्रथमच समाविष्ट होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी सध्या अनेक प्रवासी अधिक भाडे देऊन खासगी आराम बससेवेला पसंती देतात. वातानुकूलित सुविधा, आरामदायी आसनव्यवस्था, कमी प्रवास वेळ आणि रात्रीच्या प्रवासातील उपलब्ध सुविधा यामुळे खासगी आराम बससेवेचा स्वतंत्र प्रवासी वर्ग निर्माण झाला आहे. या प्रवाशांना एसटीकडे आकर्षित करण्यासाठी केवळ पर्यायी सेवा उपलब्ध करून न देता खासगी आराम बससेवेच्या तोडीची आधुनिक आणि विश्वासार्ह सेवा देण्याचे उद्दिष्ट महामंडळाने निश्चित केले आहे, असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.
नव्या सेवेत दिवसा आणि रात्रीच्या प्रवासासाठी प्रवाशांच्या गरजेनुसार वेगवेगळे पर्याय उपलब्ध करून दिले जाणार आहेत. २५० किलोमीटरपेक्षा अधिक अंतराच्या आणि किमान ५ ते ६ तासांच्या प्रवासासाठी आरामदायी ४५ आसनी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रात्रीच्या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ३० किंवा ४५ शयनयान क्षमतेच्या बसेस उपलब्ध केल्या जाणार आहेत. त्यामुळे दिवसा आरामदायी प्रवासाबरोबरच रात्रीच्या प्रवासासाठी शयनयानाची सुविधाही प्रवाशांना मिळणार आहे.
नव्या आराम बससेवेच्या आरक्षणासाठी डिजिटल सुविधेलाही प्राधान्य दिले जाणार आहे. एसटीच्या अधिकृत ऑनलाइन आरक्षण व्यवस्थेसोबतच खासगी डिजिटल ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मवरूनही या बसेसची तिकिटे आरक्षित करता यावीत, यासाठी महामंडळाचा मानस आहे. त्यामुळे प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी बसस्थानकावर जाण्याची आवश्यकता राहणार नाही. मोबाईलवरून बसची वेळ, मार्ग आणि उपलब्ध आसनांची माहिती घेऊन घरबसल्या आरक्षण करता येणार आहे. डिजिटल तिकीट प्रणालीमुळे एसटीची आराम बससेवा आधुनिक प्रवासी वाहतूक व्यवस्थेशी अधिक प्रभावीपणे जोडली जाणार आहे.
प्रवाशांना केवळ आरामदायी बसचा अनुभव न देता हाय-एंड प्रवासी सेवेचा अनुभव देण्यासाठी नव्या व्होल्वो बसेसमधील आतिथ्य व्यवस्थापनासाठी खासगी संस्थेची मदत घेण्यात येणार आहे. प्रवाशांचे स्वागत, बसमधील मूलभूत सुविधा, स्वच्छता, आवश्यक माहिती तसेच सेवा-सुविधांचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाचा वापर केला जाणार आहे. यामुळे एसटीच्या पारंपरिक प्रवासी सेवेसोबत हॉस्पिटॅलिटी आणि ग्राहकसेवेच्या आधुनिक संकल्पनेचा समावेश होणार आहे.
नव्या व्होल्वो आणि शयनयान बसेस कोणत्या मार्गांवर चालवायच्या, यासाठी महाराष्ट्रातील तसेच आंतरराज्य मार्गांचा सर्वंकष अभ्यास करण्यात येणार आहे. खासगी आराम बससेवेला मोठी मागणी असलेल्या मार्गांवर प्रवाशांची संख्या, प्रवासाची मागणी, उपलब्ध सेवा, मार्गाचे अंतर, प्रवासाचा कालावधी आणि आर्थिक व्यवहार्यता यांचा विचार केला जाईल. या अभ्यासानंतर स्पर्धात्मक मार्गांचे सर्वेक्षण करून नव्या बसेसचे मार्ग निश्चित केले जातील.
‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे घोषवाक्य अधिक व्यापक आणि आधुनिक स्वरूपात प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले. एसटी महामंडळाचे राज्याच्या कानाकोपऱ्यात असलेले विस्तृत जाळे आणि प्रवाशांचा विश्वास ही महामंडळाची ताकद आहे. या विश्वासाला आधुनिक सुविधा, डिजिटल आरक्षण व्यवस्था आणि दर्जेदार आतिथ्यसेवेची जोड देऊन लांब पल्ल्याच्या प्रवासी सेवेत नवे मानदंड निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नव्या व्होल्वो बसेसमुळे एसटीच्या सेवेला आधुनिकतेची जोड मिळणार असून आरामदायी, सुरक्षित, विश्वासार्ह आणि डिजिटल सुविधांनी युक्त प्रवासाचा पर्याय प्रवाशांना उपलब्ध होणार आहे.


