(मुंबई)
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “काँग्रेस ही सत्तेसाठी नव्हे, तर विचारांसाठी लढणारी पक्षसंस्था आहे. इंडिया आघाडीतील आणि इतर समविचारी पक्षांशी चर्चेला आम्ही तयार आहोत, पण महायुतीतील कोणत्याही पक्षाशी युती केली जाणार नाही,” असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुधवारी स्पष्ट केले.
सपकाळ म्हणाले की, निवडणुका जाहीर झाल्यानंतर आघाडी करायची की स्वबळावर लढायचे, याचा निर्णय घेतला जाईल. मात्र, या निवडणुकांमध्ये काँग्रेस सर्वाधिक जागा लढवण्याचा निर्धार ठेवत आहे.
टिळक भवन येथे झालेल्या काँग्रेस राज्य निवडणूक मंडळाच्या महत्त्वाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान सपकाळ यांनी भूषवले. या बैठकीस विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील नेते सतेज (बंटी) पाटील, माजी मंत्री नसीम खान, खासदार रजनीताई पाटील, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री आ. अमित देशमुख, आ. विश्वजित कदम, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे आदी नेते उपस्थित होते.
बैठकीनंतर सपकाळ म्हणाले की, “नगरपालिका निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह ओसंडून वाहत आहे. जिल्हानिहाय संकल्पसभा आणि आढावा बैठकांचा कार्यक्रम सुरू असून, प्रत्येक जिल्ह्यासाठी वरिष्ठ निरीक्षक आणि विधानसभा मतदारसंघासाठी निरीक्षक नेमण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीही पूर्ण झाल्या आहेत. शेवटच्या क्षणाची वाट न पाहता निर्णय घेतले जातील. तिकीट वाटपात पारदर्शकता आणि सत्तेचे विकेंद्रीकरण या तत्त्वांचा अवलंब केला जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
इंडिया आघाडीतील चर्चांबाबत सपकाळ म्हणाले, “स्थानिक नेतृत्वाला समविचारी पक्षांशी चर्चा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वामनराव चटप, राजू शेट्टी यांच्या शेतकरी संघटना, तसेच महादेव जानकर यांचा पक्ष यांच्याशी संवाद सुरू आहे. काही जिल्ह्यांमध्ये वंचित बहुजन आघाडीसोबतही चर्चा प्रगतीपथावर आहे. मात्र, मनसेकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नसल्याने, आघाडी की स्वबळावर लढाई यावर निर्णय निवडणुका जाहीर झाल्यानंतर घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज तब्बल २५ पानांचा असून, त्याची प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची असल्याचे सपकाळ यांनी सांगितले. ऑनलाईन अर्ज भरताना अनेक भागात इंटरनेट आणि सर्व्हरच्या अडचणी येतात. त्यामुळे विधानसभा व लोकसभा निवडणुकीप्रमाणे सोप्या आणि सुलभ पद्धतीने अर्ज प्रक्रिया करावी, तसेच ऑफलाइन अर्ज भरण्याची मुभा द्यावी, अशी मागणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली असल्याची माहिती त्यांनी दिली.
पार्थ पवार यांच्या भूखंड प्रकरणावर बोलताना सपकाळ म्हणाले, “या प्रकरणात कोणतीही कारवाई होणार नाही. भाजप-महायुती सरकार ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’ म्हणत सत्तेवर आले, पण आता ‘तुम भी खाओ, हम भी खाते हैं’ अशी स्थिती झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे ‘तो मी नव्हेच’ नाटकातील लखोबा लोखंडेप्रमाणे भूमिका करत आहेत,” असा टोला त्यांनी लगावला.
राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर टीका करताना सपकाळ म्हणाले, “राज्यात गुंडगिरीला राजाश्रय मिळत आहे. तुळजापूरमधील ड्रग प्रकरणातील आरोपीला भाजपाने पक्षात घेतले आहे. मटका, लँड आणि ड्रग माफियांना भाजपात सामील करून घेतले जात आहे. सरकारमध्येच गँगवॉरचे वातावरण असून, गुंडगिरीलाच खतपाणी घातले जात आहे. सत्ताधारी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या तपासात प्रगती होत नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांना न्यायालयात जावे लागत आहे; हा सरकारचा पराभव आहे,” असे त्यांनी सांगितले.

