(मुंबई / वृत्तसंस्था)
शेअर बाजारात गुंतवणूक करून मोठा नफा मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवत ६८ वर्षीय वृद्धाची एक कोटी ३० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. श्वेता विकल गुप्ता (वय ४१) ही एमबीए पदवीधर महिला असून, योगेश विवेकानंद देसाई (वय ४६) हा एका नामांकित विमा कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत आहे. सायबर फसवणुकीतून मिळालेली रक्कम स्वीकारण्यासाठी आणि ती पुढे अन्य बँक खात्यांमध्ये वळवण्यासाठी या दोघांनी आपल्या खात्यांचा वापर करण्यास परवानगी दिल्याचे तपासात समोर आले आहे.
शेअर बाजारातील गुंतवणुकीतून भरघोस परतावा मिळेल, असे सांगून संबंधित वृद्धाला जाळ्यात ओढण्यात आले. त्यानंतर फसवणूक करणाऱ्यांच्या सांगण्यावरून त्यांनी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे पाठवले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तांत्रिक तपासासह बँक खात्यांमधील आर्थिक व्यवहारांची छाननी सुरू केली.
तपासादरम्यान फसवणुकीच्या रकमेचा काही भाग श्वेता गुप्ता आणि योगेश देसाई यांच्या खात्यांमध्ये जमा झाल्याचे निष्पन्न झाले. वृद्धाकडून उकळण्यात आलेल्या एक कोटी ३० लाख रुपयांपैकी सुमारे ३० लाख रुपये थेट या दोघांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आले होते. पैशांचा मूळ स्रोत आणि फसवणुकीत सहभागी असलेल्या व्यक्तींचा माग काढणे अवघड व्हावे, यासाठी ही रक्कम त्यानंतर इतर अनेक खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आली.
महाराष्ट्र सायबरच्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या दोघांची बँक खाती ‘मनी म्यूल’ म्हणून वापरली जात होती. सायबर गुन्ह्यांमध्ये फसवणुकीतून मिळालेला पैसा एका खात्यातून दुसऱ्या खात्यात वळवण्यासाठी अशा खात्यांचा वापर केला जातो. पोलिसांनी केलेल्या पुढील तपासात या दोघांच्या बँक खात्यांचा संबंध देशातील अन्य राज्यांमध्ये नोंदवलेल्या नऊ स्वतंत्र सायबर गुन्ह्यांच्या तक्रारींशी असल्याचेही आढळले आहे. या प्रकरणांमध्ये दिल्ली, कर्नाटक, केरळ, पुदुचेरी आणि त्रिपुरा येथील तक्रारींचा समावेश आहे.
या सायबर फसवणूक नेटवर्कशी दोन्ही आरोपी किती काळापासून संपर्कात होते, याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान, संशयास्पद बँक खाती ओळखून आर्थिक व्यवहारांवर वेळेत लक्ष केंद्रित केल्यामुळे फसवणूक झालेल्या एक कोटी ३० लाख रुपयांपैकी ५० टक्क्यांहून अधिक रक्कम गोठवण्यात पोलिसांना यश आले आहे. या गोठवलेल्या रकमेत श्वेता गुप्ता आणि योगेश देसाई यांच्या खात्यांमध्ये जमा झालेल्या ३० लाख रुपयांचाही समावेश आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही रक्कम संबंधित वृद्धाला परत केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.


